देशभरातील हजार विद्यार्थ्यांचा सहभाग, रामेश्वर मधून अवकाशात झेपावणार उपग्रह
प्रतिनिधी / मिरज
डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्यावतीने देशभरातील एक हजार निवडक विद्यार्थ्यांना घेऊन एकाच वेळी शंभर उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी सांगली, मिरज कुपवाड महापालिकेच्या पाच शाळांमधील दहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामुळे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी, यासाठी स्पेस रिसर्च पेलोड क्लुब्ज चॅलेंज या स्पर्धेच्या माध्यमातून देशभरातून एक हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्या विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शकांनी मार्फत उपग्रह बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर शास्त्रज्ञांच्या सहाय्याने या विद्यार्थ्यांनी 25 ते 80 ग्रॅम वजनाचे 100 उपग्रह बनवले. हे उपग्रह 7 फेब्रुवारी रोजी तामिळनाडू येथील रामेश्वर अवकाश संशोधन केंद्रातून सोडण्यात येणार आहेत. हे उपग्रह 35 ते 38 हजार मीटर उंच जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड, हवेची शुद्धता, प्रदूषण, हवेचा दाब यांच्यासह अन्य माहिती या उपक्रमाद्वारे मिळणार आहे. एकाच वेळी 100 छोटे उपग्रह पाठविण्याचा हा विक्रम असणार आहे.








