चित्रपटगृहांमध्ये 50 टक्केच प्रेक्षकांना प्रवेश : सरकारकडून मार्गसूची जारी
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्य सरकारच्या आदेशामुळे राज्यातील सिनेरसिकांची निराशा झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यता आणि संसर्गाचा धोका वाढण्याच्या भीतीमुळे राज्यातील चित्रपटगृहांमध्ये आसनक्षमतेच्या 50 टक्केच प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने चित्रपटगृहांमध्ये 100 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची मुभा राज्य सरकारना दिली आहे. मात्र, राज्य सरकारने ही मार्गसूची जशास तसे स्वीकारलेली नाही. राज्य सरकारना याबाबत स्वायत्तता असल्याने कर्नाटक सरकारने राज्यातील चित्रपटगृहांमध्ये एकूण आसनक्षमतेच्या 50 टक्के प्रमाणातच प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांनी यासंबंधीची मार्गसूची जारी केली आहे. हा आदेश 28 फेब्रुवारीपर्यंत जारी राहणार आहे.
विवाह, कार्यक्रमांत 500 जणांना प्रवेश
औद्योगिक प्रदेश आणि व्यापारी संकुलांमध्ये पूर्ण प्रमाणात कर्मचाऱयांना कामासाठी प्रवेश देता येईल. विवाह, सभा-समारंभ, अंत्ययात्रा यामध्ये कमाल 500 जणांना एकत्र येण्याची मुभाही देण्यात आली आहे. तथापि, याप्रसंगी सामाजिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक राहणार आहे.









