पक्षभेद विसरून आंदोलन : पंचमसाली, कुरुब, वाल्मिकी समुदायांना आरक्षण देण्याबाबत चर्चा करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेंगळूर
लिंगायत, पंचमसाली, कुरुब व वाल्मिकी समाजाला आरक्षण देण्याची मागणी करून अनेक संघटना आंदोलने करत आहेत. याविषयी सभागृहात चर्चा हाती घ्यावी, अशी मागणी करून आमदारांनी पक्षभेद विसरुन मंगळवारी विधानसभेत धरणे आंदोलन छेडले. त्यावर चर्चा न झाल्याने बुधवारीही सभागृहात आंदोलन होण्याची शक्यता आहे.
शून्य प्रहर वेळेत भाजप आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांनी पंचमसाली समाजाला आरक्षण देण्यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला. 14 जानेवारीपासून पंचमसाली समुदायाचे बसवमृत्यूंजय स्वामीजी आणि वचनानंद स्वामीजी यांनी पदयात्रा सुरु केली आहे. या समुदायाचा प्रवर्ग 2 मध्ये समावेश करावा अशी मागणी आहे. याकरिता ते 400 कि. मी. मार्गक्रमण केले आहे. तरीसुद्धा सरकारने याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचप्रमाणे हालुमत कुरुब समुदायाचे निरंजनानंद स्वामीजी व ईश्वरानंदपुरी स्वामीजी यांनी देखील आपल्या समुदायाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे. गंगामतस्थ समुदायाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा आदेश केंद्र सरकारने देऊनसुद्धा राज्यात प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
काँग्रेसचे आमदार, निजदचे बंडेप्पा काशेमपुर यांनी देखील याविषयी चर्चा हाती घेण्याची मागणी केली. दरम्यान, संसदीय कामकाजमंत्री बसवराज बोम्माई यांनी शून्य प्रहर वेळेत याविषयी चर्चा करता येणार नाही. आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने याबाबत विचार करेल, असे त्रोटक उत्तर दिले. मंत्री ईश्वरप्पा यांनी देखील सरकार याबाबत सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी शून्य प्रहर वेळेत याविषयी चर्चा करणे शक्य नाही. स्वतंत्रपणे याविषयी चर्चेची मुभा देण्यात येईल, असे सांगितले.
मात्र, आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ, निजदचे बंडेप्पा काशेमपूर यांनी सभाध्यक्षांच्या आसनासमोर येऊन धरणे आंदोलन सुरू केले. त्यानंतर भाजपचे अरविंद बेल्लद, काँग्रेसचे भैरती बसवराज, कुसुमा शिवळ्ळी, राघवेंद्र यत्नाळ यांच्यासह अनेक आमदारही धरणे आंदोलनात सहभागी झाले.
…अन् आमदारांनी धरणे मागे घेतले
सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी वेळोवेळी विनंती करून देखील आमदारांनी आंदोलनातून माघार घेतली नाही. यावेळी मंत्री श्रीरामुलू, आमदार अरग ज्ञानेंद्र यांनी राज्यपालांच्या भाषणावरील चर्चा सुरू ठेवण्याची विनंती सभाध्यक्षांकडे केली. मात्र आमदारांनी भूमिका बदलली नाही. शेवटी सभाध्यक्षांनी वेगळय़ा स्वरुपात लेखी विनंती अर्ज करा. त्यानंतर चर्चेसाठी वेळ देण्यात येईल, असे सूचविल्यानंतर धरणे आंदोलनातून माघार घेत आमदार आपापल्या आसनावर जाऊन बसले.









