वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर आता सर्वोच्च पातळीवर पोहोचू लागले आहेत. इंधनाचे दर वाढलेले असतानाच अर्थसंकल्पात अधिभार वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण शुल्क कमी करून याचा भार ग्राहकांवर न टाकण्याची खबरदारी सरकारने घेतली आहे. भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पेट्रोलच्या किमतीवरून सरकारचे कान टोचले आहेत. स्वामी यांनी मंगळवारी ट्विट करत पेट्रोलच्या दरावरून टीका केली आहे. स्वामी यांनी एक छायाचित्र प्रसारित केले असून यात भगवान रामाच्या देशासोबत रावणाचा देश आणि माता सीतेच्या देशामधील पेट्रोलच्या किमतीची तुलना करण्यात आली आहे. या छायाचित्रात ‘रामाच्या भारतात पेट्रोल 93 रुपये, सीतेच्या नेपाळमध्ये 53 रुपये आणि रावणाच्या लंकेत 51 रुपये’ असल्याचे नमूद आहे.
नववर्षात दरवाढ
नव्यावर्षात पेट्रोल आणि डिझेलचे दर आता सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. मागील 10 महिन्यांमध्ये पेट्रोलचा दर सुमारे 16 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढला आहे.
पेट्रोलसह डिझेलचा दरही उच्चांकी स्तरावर पोहोचणार आहे. मागील 10 महिन्यांमध्ये याच्या दरात 14 रुपयांपेक्षा अधिकची वाढ झाली आहे.









