प्रतिनिधी/इस्लामपूर
येथील माजी नगराध्यक्ष सुभाष यशवंत सुर्यवंशी (६०) यांच्यासह त्यांच्या चालका वरील खूनी हल्ला प्रकरणातील आरोपी जितेंद्र बापू सुर्यवंशी (रा.बुरुड गल्ली, इस्लामपूर) याला न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पहिले अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश एस सी मुनघाटे यांनी हा निकाल दिला. सुभाष सूर्यवंशी हे नगराध्यक्ष पदावर असताना दि. १४ सप्टेंबर २०१६ रोजी हा प्रकार घडला होता.
दि.१४ सप्टेंबर २०१६ रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयातील अधिकारी शहरातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी आले होते. आष्टा नाका परिसरातील अंबिका उद्यानाला भेट देवून अधिकारी निघून गेले. त्यानंतर सुभाष सुर्यवंशी हे त्यांचा चालक सिध्दनाथ सावंत यांच्यासह मोटारसायकलवरून आपल्या घराकडे चालले होते. सुर्यवंशी पाठीमागे बसले होते. सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पोस्ट ऑफिस जवळील डॉ.बी.एम.पाटील यांच्यादवाखान्यासमोर पाठीमागून मोटार सायकल वरून भरधाव वेगात येवून आरोपी जितेंद्र याने धडक दिली.
दरम्यान त्याने आपल्या ताब्यातील धारदार कोयत्याने नगराध्यक्ष सुर्यवंशी यांच्यावर हल्ला चढवला. त्याच्या उजव्या कानावर व गालावर निसटता वार झाला. यावेळी चालक सावंत यांनी त्याला पकडून ठेवून प्रतिकार केला. त्यामध्ये ते देखील जखमी झाले. या घटने अगोदर दोन महिने सुभाष सुर्यवंशी यांचा पुतण्या विजय याने रिक्षा भाडयाने न दिल्याच्या रागातून आरोपी जितेंद्र याने हे कृत्य केले होते.या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख व जिल्हा सहाय्यक सरकारी वकील रणजित पाटील यांनी काम पाहिले.
Previous Articleप्राथमिक शिक्षक बँकेकडून रहिमतपूर पालिकेला 50 हजारांचा निधी
Next Article पुणे विभागातील 5 लाख 62 हजार 708 रुग्ण कोरोनामुक्त!








