क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
दुर्गा डेव्हलपर्स हुबळी आयोजित दुर्गा डेव्हलपर्स चषक 13 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने दुर्गा स्पोर्ट्स अकॅडमी हुबळी संघाचा 9 गडय़ानी पराभव करून दुर्गा चषक पटकाविला. लाभ वेर्णेकरला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हुबळी येथील बी. जी. मैदानावर खेळविण्यात आलेल्या या अंतिम सामन्यात दुर्गा स्पोर्टस् संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 77 धावा जमविल्या. त्यांच्या लोकेशने 14 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे वरद सुर्यवंशीने 13 धावात 4, अथर्व दिवटेने 16 धावात 2 तर लाभ वेर्णेकर, ऋतुराज सिंग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने 16.4 षटकात 1 बाद 78 धावा करून सामना 9 गडय़ानी जिंकला. त्यात लाभ वेर्णेकरने 7 चौकारासह नाबाद 41, आशुतोष हिरेमठने 4 चौकारासह 23 तर सचिन सुतारने नाबाद 10 धावा केल्या. तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स संघाने केसीसी विजापूर संघाचा 1 गडय़ाने तर दुर्गा स्पोर्ट्सने धारवाडचा 4 गडय़ानी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
अंतिम सामन्यानंतर प्रमुख पाहुणे दुर्गा डेव्हलपर्सचे संचालक हणमंतय्या मेमगिरी, धारवाड विभागाचे माजी समन्वयक बाबा भूसद, प्रमुख प्रशिक्षक अर्मुगन, पवन गंगावती, शिवानंद गुंजाळ आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बेळगाव स्पोर्ट्स क्लब व उपविजेत्या दुर्गा डेव्हलपर्स संघाला चषक, प्रमाणपत्र, सर्व खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर लाभ वेर्णेकर तर उत्कृष्ट फलंदाज आशुतोष हिरेमठ यांना चषक देऊन गौरविण्यात आले.









