दिवसभर जागा आरक्षित केल्याने रस्ते बंद,स्थानिकांनाच जाण्यास मज्जाव,सुरक्षारक्षकांकडून दादागिरीची उत्तरे
प्रतिनिधी / पणजी
राजधानी पणजी शहरात गेल्या काही दिवसांपासून सिनेमा शूटिंग सुरु झाले आहे. या शूटिंगचा नाहक त्रास स्थानिक रहिवाश्यांबरोबरच व्यापारी वर्गाला तसेच वाहन चालकांना सोसावा लागत आहे. गोवा मनोरंजन सोसायटी संस्थेने तसेच पणजी महानगरपालिकेने याची गंभीर दखल घेऊन शूटिंगसाठी सुट्टीचा दिवस तसेच वेळेचे बंधन घालून परवाना द्यावा, अशी मागणी विविध क्षेत्रातील त्रस्त घटकांनी केली आहे.
गोवा म्हणजे हिरवेगार डोंगर, प्राचीन चर्चस, मंदिरे, पोर्तुगीजकालीन जुनी घरे, सांस्कृतिक स्थळे, बीच, शांत स्वभावाचे लोक आणि कोरोना रोगाची ना भीती, ना नियम यामुळे बरेच सिनेमा निर्माते गोव्यात शूटिंगला पसंती देत आहेत. या शूटिंगला परवानगी देणाऱया संबंधित संस्थेच्या अधिकाऱयांना मात्र या शूटिंगचा तेथील नागरिकांना, व्यापाऱयांना, वाहन चालकांना त्रास होतो याची कोणतीच चिंता नसते. त्याचा फायदा हे सिनेमा निर्मातेही घेतात. आपल्या सोयीनुसार दिवसभरात कधीही शूटिंगसाठी रस्ते बंद केले जातात. शहरातील काही भाग आरक्षित करुन सुरक्षारक्षकांद्वारे स्थानिकांनाच त्या भागातून जाण्यास मज्जाव केला जातो. याबाबत त्यांना विचारणा केली असता दादागिरीचा सूर ऐकू येतो.
छोटय़ा व्यापाऱयांचे नुकसान
दिवसभर शूटिंगमुळे त्या भागात बाकींच्याना प्रवेश बंदी असते. त्यामुळे तेथील व्यापाऱयांना नुकसान सोसावे लागते. या शूटिंगचा व्यापाऱयांना काही फायदा आहे, असेही काही नाही. होते ते फक्त नुकसानच. या शूटिंगचा मोठय़ा आस्थापनांना व सरकारला फायदा होत असतो मात्र दिवसभर दुकानात ग्राहक न आल्याने स्थानिक छोटय़ा दुकानदारांना नुकसान सोसावे लागते. ज्याचा आम्हाला काहीच फायदा नाही त्या शूटिंगसाठी आम्ही नुकसान का सोसावे असा प्रश्न आता हे व्यापारी विचारीत आहेत.
शूटिंगच्यावेळी रस्त्यावरील वाहनांचा त्रास होऊ नये यासाठी पहाटेच पोलिसांना नेमले जाते. शूटिंगसाठी त्या भागात वाहने पार्क करण्यास न देणे, पार्क केलेल्या गाडय़ा किंवा इतर वाहने काढण्यासाठी स्थानिकांना विनंती करण्याचे काम पोलिसांनाच करावे लागते. दोन – चार तासासाठी पोलीस मागविले जातात परंतु शूटिंग संपेपर्यंत चाराचे आठ तास झालेले असतात. त्यामुळे दिवसभर उभे राहून पोलीसही वैतागलेले असतात.
या सर्व समस्यांची दखल संबंधित अधिकाऱयांनी घेऊन यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. यावर योग्य तो निर्णय झाल्यास शूटिंगला चांगले दिवस येतील व महसूलही वाढेल. मात्र स्थानिकांना व व्यापाऱयांना होणारा त्रास सुरु राहिल्यास शूटिंगसाठी असलेले सुरक्षारक्षक व स्थानिकांचा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.









