नव्या दमाचा गायक आणि संगीतकार समर्थक शिंदेनं करवली या धमाल गाण्याद्वारे संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे. समर्थकनं या गाण्याचं संगीत आणि गायन अशी दुहेरी जबाबदारी निभावली आहे. या नवरीची करवली लय गोरी गोरी….असे धमाल शब्द असलेलं हे गाणं आता नक्कीच लग्नांमध्ये वाजणार यात शंका नाही.
साईनाथ राजाध्यक्ष यांनी निर्मिती केलेलं परवली हे गाणं सप्तसूर म्युझिक या यूटय़ूब चॅनेलवर लाँच करण्यात आलं आहे. सप्तसूर म्युझिक या म्युझिक चॅनेलने गेल्या पाच महिन्यांत सहा गाणी लाँच केली असून, चॅनेलला जवळपास 7 हजार सबक्रायबर्स आहेत. करवली गाण्यात उर्मिला जगताप, हृषिकेश झगडे, अभिषेक घाग, सुनील जाधव, गणेश खाडे असे कलाकार आहेत. संतोष भांगरे यांनी कोरिओग्राफी केली आहे. तर हरिदास कड यांनी हे गाणं लिहिलं आहे. मराठी गाण्यांमध्ये खास लग्नाची अशी काही वेगळी गाणी आहेत. त्यात आता करवली या गाण्याचीही भर पडणार आहे. फास्ट बिट्स आणि धमाल शब्द असलेलं हे गाणं आता लग्न सोहळ्यांतील हळद, संगीत कार्यक्रमांमध्ये नक्कीच वाजणार आहे.









