माजी मंत्री महादेव जानकर यांचे प्रतिपादन : नंदगड येथील संगोळ्ळी रायण्णा समाधीस्थळाला दिली भेट : राष्ट्रीय समाज पार्टीचा 13 वा वार्षिकोत्सव
वार्ताहर / नंदगड
क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिले रणसिंग फुंकले. हा लढा भारत स्वतंत्र होईपर्यंत चालला. संगोळ्ळी रायण्णा हे केवळ काही विशिष्ट विभागापुरतेच क्रांतिकारी पुरुष नव्हते. तर ते राष्ट्रीय पातळीवरील महान योद्धा होते. त्यामुळे सर्वांनी त्यांना राष्ट्रीय स्तरावरील महान क्रांतिकारी राष्ट्रपुरुष म्हणूनच ओळखावे, असे आवाहन रासपचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे राष्ट्रीय समाज पार्टीचा तेरावा वार्षिकोत्सव साजरा करण्यात आला. माजी मंत्री महादेव जानकर व रासपच्या अनेक मान्यवरांनी व आमदारांनी नंदगड येथील संगोळ्ळी रायण्णा समाधीस्थळी व फाशीस्थळी भेट दिली. त्यानंतर समाधीस्थळी वार्षिकोत्सव साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर होते.
माजी मंत्री महादेव जाणकार म्हणाले, तेरा वर्षांपूर्वी मी नंदगड येथील या समाधीस्थळी आलो होतो. त्यावेळी माझा एक राष्ट्रीय पक्ष व्हावा व तो वाढावा, अशी मी संगोळ्ळी रायण्ण्णा यांच्याकडे प्रार्थना केली होती. त्यानुसार काही वर्षातच मी आमदार व मंत्री झालो. शिवाय आज माझ्या पक्षाचे दोन आमदार, 98 नगरसेवक व जि. पं. सदस्य आहेत. संगोळ्ळी रायण्णा यांच्या आशीर्वादाने माझा पक्ष वाढत चालला आहे. 26 जानेवारीच्या निमित्ताने मी अनेकवेळा येथे येऊन रायण्णांचे दर्शन घेतले आहे. या पुढील काळात आमच्या रासप पक्षाचा मुख्यमंत्री होईल. तो सुद्धा 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला नंदगडला निश्चितच येईल. देशातील सात राज्यात रासप पक्षाचे अनेक कार्यकर्ते आहेत. कर्नाटकातही आमच्या पक्षाचे मोठे जाळे वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर रासपचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले, रासपचे कर्नाटक राज्य संयोजक व अध्यक्ष धर्माना तोंटापूर, रासपचे गोवा राज्य अध्यक्ष किशोर राव, सुनील बंडगार, गोविंद शिंदे, देव राजू, नंदगडचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश दलाल, कसबा नंदगड ग्राम पंचायतीचे माजी चेअरमन प्रवीण पाटील, आप्पाजी पाटील, संगोळ्ळी रायण्णा विकास कमिटीचे शंकर सोनोळी आदीसह मान्यवर उपस्थित
होते.