कणकुंबी : कोरोनाकाळात आपला जीव धोक्मयात घालून कार्य केलेल्या कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी तसेच अंगणवाडी कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण देण्यात आले. केंद्र सरकारने 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ केला असून पहिल्या टप्प्यात रुग्णालयातील कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार, बाल विकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश आहे.
कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड-19 महामारी प्रतिबंधक लसीचा उद्घाटन समारंभ जांबोटी विभागाचे जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बेळगाव येथील युनायटेड सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या आश्रयाखाली सुरू असलेल्या कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी डॉ. बी. टी. चेतन यांनी कोविड-19 महामारी आणि कोरोना प्रतिबंधक लसी संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. जि. पं. सदस्य जयराम देसाई यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राला एकूण 134 लसीकरणाचे डोस पुरविण्यात आले आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी आणि सहाय्यक यांचा समावेश आहे.
याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंगणवाडीच्या सर्व कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राचे क्लार्क एम. के. सुभाष यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अमजद खान यांनी प्रास्ताविक केले. कलीम कोलकार यांनी आभार मानले.