सातारा / प्रतिनिधी :
प्रजासत्ताकदिनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन घटनांमधील पाचजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक राहूल खाडे व सुनील कर्णे यांनी फिर्यादी दाखल केल्या आहेत. या पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ॲट्रॉसिटीच्या गुन्हय़ात आरोपींना अटक केलेली नसल्याच्या कारणातून मनोहर बापू सावंत (वय 43, रा. सोनगाव तर्फ सातारा) यांनी शर्टाच्या बाह्याला पेटवून घेतले व आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तावर उपस्थित अधिकारी व पोलिसांनी तातडीने आग विझवत त्यांना ताब्यात घेतले व नंतर अटक केली आहे.दुसऱ्या घटनेत पुनर्वसनातील आमचा सातबारा कोरा झाला नसल्याने आम्ही जीव देत असल्याचे म्हणत संतोष धोंडिबा वांगडे (वय 38), राहूल मारुती वांगडे (वय 27) व गणेश पांडुरंग वांगडे (वय 42, सर्व रा. पिंपरी, पो. शहापूर, ता. कराड) यांनी रॉकेलसारखा द्रव पदार्थ अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी तातडीने त्यांच्या अंगावर पाणी ओतून या तिघांनाही ताब्यात घेत अटक केली आहे.
तर तिसऱ्या घटनेत ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करता अन्यथा मी जीव देतो असे म्हणत अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या सुनील युवराज कांबळे वय 30 रा. वेळोशी, ता. फलटण याला पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली आहे. या घटनांचा पुढील तपास पोलीस हवालदार मेचकर व एम. के. जाधव व पोलीस नाईक पी. एस. जंगम करत आहेत.









