कारखान्यासाठी 2 हजार 400 कोटी खर्च : वार्षिक 20 लाख गाडय़ांचे उत्पादन
वृत्तसंस्था/ मुंबई
ओला आपल्या इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीसाठी सिमेन्ससोबत करार करणार आहे. जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रीक दुचाकी वाहन निर्मिती कारखाना देशातील तामिळनाडू राज्यामध्ये आकाराला येत आहे. दोन्ही कंपन्यांच्या भागीदारीतून भारतामध्ये इलेक्ट्रीक वाहनांचा कारखाना बनवला जाणार आहे. यासाठी 2 हजार 400 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मागच्या महिन्यात डिसेंबरमध्ये ओलाने कारखाना स्थापण्यासाठी तामिळनाडू राज्य सरकारशी करार केला आहे. या नव्या कारखान्याच्या निर्मितीनंतर अंदाजे दहा हजार जणांना रोजगार प्राप्त होणार आहे. यात स्थानिकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. नव्या तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रीक वाहनांचे उत्पादन या कारखान्यात घेतले जाणार आहे. वर्षाला 20 लाख इलेक्ट्रीक दुचाकी बनवण्याचे उद्दिष्ट कंपनीने समोर ठेवले आहे. अनेक कारखान्यांमध्ये कामगारांमार्फत काम केलं जातं. पण ओलाने मात्र आपल्या कारखान्यात रोबोटची मदत घेण्याचे ठरवले आहे. महत्त्वाचे म्हणजे या कारखान्यामध्ये 5000 रोबोट काम करणार आहेत.









