सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलात सेवा बजावत असलेले फौजदार भरत नाळे यांचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदकाने गौरव होणार आहे. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हे पदक जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
भरत नाळे हे सातारा पोलीस दलात 1998 साली भरती झाले. पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक फौजदार पर्यंत त्यांना पदोन्नती मिळाली. दरम्यान, फौजदार परीक्षा दिल्याने त्यांची त्यातही निवड झाली असून, गेल्या अडीच महिन्यांपासून कोरेगाव पोलीस उपविभागीय कार्यालयाचे ते वाचक (रीडर) म्हणून सेवा बजावत आहेत.
सातारा पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्यांनी विविध पोलीस ठाणी, विभागात काम केले आहे. आतापर्यंत 749 रिवॉर्ड त्यांना मिळालेली आहेत. 2015 साली त्यांना पोलीस महासंचालक पदकाने (डीजी मेडल) गौरवण्यात आले होते. गत महिन्यात जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल तसेच फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत बर्डे यांना देखील पोलीस महासंचालकांनी पदक देऊन गौरवले होते. आता भरत नाळे यांच्या रूपाने राष्ट्रपती पदकामुळे जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे.









