बाणूरगड येथे बहिर्जी नाईक समधीस्थळाचा विकास करणार
प्रतिनिधी / विटा
शूरवीर बहिर्जी नाईक हा राजकारणाचा विषय नाही. हा महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाचा विषय आहे. हे स्मारक पूर्ण करायचे भाजपा पक्षाने ठरवले आहे. बाणूरगड येथे शुरवीर बहिर्जी नाईक यांच्या समाधी स्थळाचा विकास व्हावा, अशी मागणी आपण विधान परिषदेत केली होती. परंतू हे सरकार आमदारांच्या मागण्या बाबत गंभीर नाही, अशी टीका भाजपचे प्रवक्ते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
विटा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार पडळकर बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास पाटील, पंकज दबडे, सत्यजित पाटील, सुजित पवार, मनोज यादव यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार पडळकर म्हणाले, बाणूरगड येथे शुरवीर बहिर्जी नाईक यांच्या समाधी स्थळाचा विकास व्हावा, अशी मागणी आपण विधान परिषदेत केली होती. परंतू हे सरकार आमदारांच्या मागण्या बाबत गंभीर नाही. हे स्मारक पूर्ण करण्याचा संकल्प माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्या अनुषंगाने आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या निधीतून पंचवीस लाख देऊ केलेत. इतर भाजपा आमदार आणि राज्यसभेचे काही खासदार निधी देणार आहेत, अशी माहिती आमदार पडळकर यांनी दिली.
आमदार आणि खासदार निधी कमान, मेघडंबरी आणि पुतळ्यावर खर्च करता येत नाही. जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांनी हा विषय मांडला आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, अध्यक्षा प्राजक्ता कोरे आणि भाजपाच्या इतर सदस्यांनी शूरवीर बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाच्या विषयाला मान्यता दिली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक कोटी पर्यंतचा खर्च करण्यात येणार आहे.
आमदार पडळकर यांनी तयार केलेला विकास आराखडा पत्रकार परिषदेत दाखवला. स्मारकाच्या ठिकाणी दगडी सरंक्षक भिंत, दगडी फरशी अशा पद्धतीने चांगले काम करण्याचे ठरवले असल्याचे आमदार पडळकर यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुर्लक्षित, उपेक्षित योद्धे लोकांपुढे आले पाहिजेत. त्यांची स्मारके, समाधी स्थळे लाखो लोकांना ऊर्जा, प्रेरणा देतात. बाणुरगड येथील परिसराची पाहणी, मोजणी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे विकास आराखडा आणि इतर कागदपत्रे सुपूर्द केली आहेत. शूरवीर बहिर्जी नाईक यांचे यथोचित स्मारक व्हावे, या विषयाचे कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले.