प्रतिनिधी / इचलकरंजी
डॉ. नाईक…..या नावातच एक प्रभावी रसायन होतं.
हेर्ले आणि पंचक्रोशीतील प्रत्येकाला ओळखीचं असणारं हे नाव….डॉ. नाईक….
१९६३ मध्ये जिल्ह्यातील पहिल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना हेर्ले येथे झाली. त्यानंतर बहुतांशी पहिला खाजगी दवाखाना १९७६च्या दरम्यान गावात सुरू झाला. तो दवाखाना होता डॉ. अरविंद लक्ष्मण नाईक यांचा. खऱ्या अर्थाने येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची आरोग्य सेवा करणारे डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती.
७० च्या दशकात प्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांची मुख्य भूमिका असलेल्या हात लावेल तिथे सोने या मराठी चित्रपटाची निर्मिती झाली. यातील एका दृश्याचे चित्रीकरण आपल्या गावात झाले होते. नाईक यांच्या वाड्याच्या दरवाज्याच्या लोखंडी कडीला निळू फुले हात लावतात आणि ती कडी सोन्याची होते. हे एका चित्रपटातील दृश्य जरी असले, तरी या वाड्यातच असलेल्या डॉ. नाईक यांच्या दवाखान्या आणि उपचार पद्धतीसंदर्भात तंतोतंत साम्य वाटते. जस एक अभिनेता लोखंडाच्या कडीला हात लावतो, आणि त्याचे सोने होते, अगदी त्याचप्रमाणे या दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला डॉ. नाईक यांचे हास्यवदन आणि तुला काय झालंय रे ..! हे त्यांच एक वाक्य तो रुग्ण ठणठणीत होण्यास पुरेसे होते.
डॉ. नाईक यांच्या दवाखान्यात येणारा रुग्ण दुसऱ्या दिवशी ठणठणीत बरा व्हायचा. हा अनेकांचा अनुभव त्यांच्यातील खऱ्या आरोग्य दूताचे दर्शन घडवून देतो. ४० वर्षाहून अधिक काळ, हेर्ले पंचक्रोशीत प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देणारे डॉ. ए. एल. नाईक यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी २३ जानेवारी रोजी पहाटे इहलोकच निरोप घेतला. नेहमी हसतमुख असणारे, दवाखान्यात पाय टाकताच मला बरं व्हायचंय हा विश्वास प्रत्येक रुग्णात निर्माण करणारे, कडक शिस्तीचे डॉ. नाईक आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने गावातील खरा आरोग्यदूत हरपला आहे, हे नक्की…!