सांगली / प्रतिनिधी
लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करू अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. आता अचानक त्यांनी शब्द फिरवला आहे. त्यामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला असून वीज कनेक्शन कट करण्याचा प्रयत्न झाल्यास महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जोड्याने मारू असा इशारा भाजपचे संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिला. याबाबतचे निवेदन महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांना देणार असल्याचेही माने यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी प्रियानंद कांबळे, श्रीकांत वाघमोडे, राजू जाधव, अमित भोसले, प्रथमेश वैध, अण्णासाहेब वडर, ज्योती कांबळे, सौ.माधुरी वसगडेकर, संगीता जाधव आदी उपस्थित होते. पुढे बोलताना माने म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक स्थिती ढासळली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करू अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे सर्व सामान्यांना दिलासा मिळाला होता. ऊर्जा मंत्र्यांनी आता शब्द फिरवला आहे. थकीत वीज बिल वसुलीचे आदेश दिले आहेत.
हा विश्वासघात आहे. ऊर्जा मंत्र्यांनी घेतलेल्या या तुघलकी निर्णयामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. भाजप मात्र नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार आहे. महावितरणने नागरीकांची वीज कनेक्शन कट करण्याचा प्रयत्न करू नयेत. अन्यथा अधिकारी, कर्मचाऱ्यांना जोड्याने मारू असा इशारा देत माने म्हणाले, याबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांना।निवेदन देणार आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील.