बौध्द समाज स्मशानभूमी कार्यकारी मंडळाचे नगर परिषदेला निवेदन
चिपळूण
शहरातील ओझरवाडी येथे बौध्द समाजाची पूर्वांपार असलेल्या स्मशानातील वॉल कंपाऊंड तोडून त्यातील माती काढून अतिक्रमण केल्याप्रकरणी मंगळवारी बौध्द समाज स्मशानभूमी कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱयांनी नगर परिषदेला याबाबतचे निवेदन दिले. दरम्यान, यामुळे स्मशानातील दफन केलेल्या शवाची नासधूस झाली असून यामुळे बौध्द समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे नमून केले आहे.
निवेदनात म्हटले की, चिपळूण नगर परिषद हद्दीतील सि.स.नं 6773, 6774, व 6787 सर्व्हे नं. 165 अ, हि. नं. 107 पैकी जमिनीत चिपळूण पाग-बौध्दकॉलनीतील बौध्द सामाजाची पूर्वंपार स्मशानभूमी आहे. चौपदरीकरणात या स्मशानभूमीची जांभ्याची संरक्षक भिंत व शेड गेली असून त्याचा मोबादल्याची रक्कम उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकाऱयांनी चिपळूण नगर परिषदेकडे वर्ग केली आहे. या स्मशनभूमीलगत शंकराचे मंदिर असून तेही या चौपदरीकरणात जात असल्याने त्यासाठी स्मशानभूमीची काही जागा मंदिरासाठी मिळावी, यासाठीची मागणी शहरातील ओझरवाडी येथील जय हनुमान मित्र मंडळाने पाग-बौध्दकॉलनीतील बौध्द समाज स्मशानभूमी कार्यकारी मंडळाकडे केली होती. त्यावर ही जागा नगर पालिकेची असल्याचे त्यांना सांगितले होते.
असे असताना 19 जानेवारी रोजी स्मशानभूमीत असणाऱया विहिरीलगत लगत जय हनुमान मित्र मंडळाच्या पदाधिकाऱयांनी विहिरीलगतची सुरक्षक भिंत तोडून आतमध्ये शिरकाव केला. तसेच स्मशानाभूमीतील माती काढली असून यामुळे पूर्वांपार दफन केलेल्या शवाची नासधूस झाल्याचा प्रकार मंडळाच्या पदाधिकाऱयांच्या निदर्शनास आला. यातून बौध्द समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रश्नी पालिकेने अतिक्रमण देखरेख कर्मचाऱयास त्याठिकाणी खात्री करण्यास पाठवले असता त्यांनी संरक्षक भिंत आहे तशीच असून कोणतेही बांधकाम केले नसल्याचे सांगितले. याप्रश्नी बौध्द समाज स्मशानभूमी कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱयांनी पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्याशी चर्चा करुन कारवाईची मागणी केली आहे.
यावेळी आरपीआय युवा नेते राजू जाधव, जयंत जाधव, रमाकांत सकपाळ, मंगेश जाधव, धनजी जाधव, राजेंद्र जाधव, प्रभाकर सकपाळ आदी उपस्थित होते.









