बेंगळूर : तामिळनाडूतील एआयएडीएमके पक्षाच्या नेत्या व्ही. के. शशिकला नटराजन यांची 27 जानेवारी रोजी बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहातून मुक्तता होणार आहे. 4 वर्षांच्या कारावासानंतर त्यांची मुक्तता करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. यासंबंधीचा मेल कारागृहाच्या मुख्य अधिक्षकांनी केला आहे, अशी माहिती शशिकला यांचे वकील एन. राजा सेंथूर पांडियन यांनी दिली आहे. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यासह चौघांना बेहिशोबी मालमत्ता संपादनप्रकरणी विशेष न्यायालयाने 2014 मध्ये चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचाच निकाल कायम ठेवला होता.
शशिकला यांच्याकडून दंडाची रक्कम आल्यास त्यांची 27 जानेवारीला मुक्तता करण्यात येईल, असे कारागृह प्रशासनाने न्यायालयाला सांगितले होते. त्यानुसार शशिकला यांच्या कुटुंबीयांनी 10 कोटी 10 हजार रुपये दंड न्यायालयात जमा केले होते.









