ऊसतोड मजूर देण्याचे सांगत केली होती फसवणूक
प्रतिनिधी/शिरोळ
ऊसतोड मजूर देतो म्हणून तीस लाखाची फसवणूक करणाऱ्या तिघांना शिरोळ पोलिसांनी शिताफीने अटक केली. या तिघांना जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत माहिती अशी की, अर्जुनवाड येथील प्रशांत विठ्ठल पाटील यांनी श्री. दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना ऊस तोड मजूर देतो म्हणून संशयित आरोपी सुखदेव रावण बरडे (55 रा. डोंगर पिंपळा ता. आंबेजोगाई, जि. बीड) यास फिर्यादी याने आठ लाख 75 हजार रुपये रोख रक्कम दिली होती. सन 2019 , 20 सालासाठी मजूर पुरवठा, न केल्याने हतबल झालेल्या प्रशांत पाटील यांनी 18 फेब्रुवारी 2020 रोजी शिरोळ पोलिसात फिर्याद दिली होती.
तसेच शिरोळ येथील उत्तम छानदेव देशमुख यांनी ऊसतोड मुकादम भास्कर रोहिदास राठोड (रा. बेलोरा ता. जिंतूर, जि. परभणी) यास बारा लाख रुपये दिले. ऊस तोड मजूर न पुरविता फसवणूक केल्याची फिर्याद दिली होती. तसेच अर्जुनवाड येथील विठ्ठल आकाराम पाटील यांनाही ऊसतोड मुकादम राजेंद्र महादेव गुगवाडे (रा शेडयाळ, ता. जत, जि. सांगली) यांला आठ लाख 85 हजार रुपये रोख रक्कम दिली. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता त्यांनीही 18 फेब्रुवारी 2020 रोजी फिर्याद दिली होती.
शिरोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सुळ पो.हे.कॉ ज्ञानेश्वर सानप, हनुमंत माळी, पोलीस कॉन्स्टेबल ताहीर मुल्ला यांनी बीड, परभणी व सांगली जिल्ह्यातील आरोपींना शिताफीने अटक केली.









