प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 223 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या होत्या. त्यामध्ये 652 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची सोमवारी मतमोजणी झाली. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा गड असून तो याही निवडणुकीत अभेद्य असाच राहिला असून महाविकास आघाडीच्यासोबत भाजपाने जोरदार फाईट दिली. आठ विधानसभा मतदार संघाचे चित्र दुपारी हाती आले. पक्षीय पातळीवर निवडणूका झालेल्या नसल्या तरीही पक्षीय नेत्यांना माणणाऱ्या पॅनेलवर निवडून आल्याने जिह्यात राष्ट्रवादीचाच करिष्मा कायम राहिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या विचाराच्या 487 एवढ्या ग्रामपंचायती झाल्या आहेत. प्रत्येक आमदारांनी आपआपला गड राखण्यात यश मिळवले आहे. जिल्ह्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पाल, पुसेगाव, लिंब, वाठार किरोली, ल्हासुर्णे आदी ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्याने सत्तांधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी सोमवारी मतमोजणी झाली. तत्पूर्वी बिनविरोध झालेल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांच्या ग्रामपंचायती आलेल्या आहेत. त्याचबरोबर भाजपाच्या विचाराच्या ग्रामपंचायती आल्या होत्या. पाटणमध्ये शिवसेनेच्या काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यानंतर चित्र हाती आले ते राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जिल्ह्यावर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. त्यामध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, माणचे प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे, रणजित देशमुख यांनी मेहनत घेतल्याने जिल्ह्यात 487 ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व राखत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे हे दाखवून दिले.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात भाजपाने उसळी घेतल्याचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळाले. त्यामध्ये कराड दक्षिण मतदार संघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापेक्षा भाजपाचे डॉ. अतुल भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनी तब्बल 29 ग्रामपंचायती खेचून आणल्या. पाटणमध्ये पारंपारिक लढती देसाई आणि पाटणकर गट अशा झाल्या असल्या तरीही भाजपाने आपले अस्तित्व काही ठिकाणी दाखवून दिले. सातारा विधानसभा मतदार संघात आमदार शिवेंद्रराजे यांच्या विचाराच्या जास्त ग्रामपंचायती आल्या असल्या तरीही राष्ट्रवादी व खासदार उदयनराजे यांच्या विचारांच्याही काही ठिकाणी सत्ता आली आहे.
कराड दक्षिण वगळता सर्व मतदार संघात आमदारांचा वरचष्मा
वाईमध्ये आमदार मकरंद पाटील यांनी भाजपाला डोके वर काढू दिले नाही. माण मतदार संघात भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विचारांच्या ग्रामपंचायती दिसून आल्या. कोरेगावमध्ये आमदार महेश शिंदे यांच्या विचारांच्या ग्रामपंचायतींची संख्या मोठी दिसत होती. त्यामुळे भाजपाला केवळ 16 ठिकाणी ग्रामपंचायतीत वर्चस्व राखता आले. फलटण विधानसभा मतदार संघात 85 ठिकाणी राष्ट्रवादीला तर भाजपाला 5 ठिकाणी खाते खोलता आले. माण तालुका विधानसभा मतदार संघात 120 ग्रामपंचायतीमध्ये 44 ठिकाणी राष्ट्रवादी तर भाजपाला 74 ठिकाणी, रासप 1 आणि शिवसेना 1 अशा ग्रामपंचायतींचा निकाल लागल्याचा अंदाज आहे.
वाई विधानसभा मतदारसंघात 174 ग्रामपंचायतीपैकी 152 ठिकाणी राष्ट्रवादी तर 16 ठिकाणी भाजपा तर 6 शिवसेनेच्या ग्रामपंचायती लागलेल्या आहेत. कोरेगाव विधानसभा मतदार संघात 78 ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादीकडे 35 तर शिवसेनेकडे 43 ग्रामपंचायती लागलेल्या आहेत. कराड उत्तरमध्ये 86 ग्रामपंचायतीपैकी 72 राष्ट्रवादीकडे 12 भाजपा, 1 शिवसेना आणि 2 काँग्रेसकडे गेल्या आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात 53 ग्रामपंचायती भाजपाचे 29 तर काँग्रेसचे 22. फलटण विधानसभा मतदारसंघात 90 ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादीकडे 85 तर भाजपाकडे 5 ग्रामपंचायती लागल्या. माण विधानसभा मतदार संघात 120 ग्रामपंचायतीपैकी 74 ग्रामपंचायती या भाजपाकडे 1 रासप, 1 शिवसेना तर 44 राष्ट्रवादी, सातारा विधानसभा मतदार संघात 159 ग्रामपंचायतीपैकी 114 भाजपा, राष्ट्रवादी 45, पाटण विधानसभा मतदार संघात 119 ग्रामपंचायतीपैकी शिवसेना 62, राष्ट्रवादी 54 असे पक्षीय बलाबल ग्रामपंचायतीत असल्याचे पक्षीय कार्यालयात अंदाज वर्तवण्यात आले.
सत्ता राखण्यात यश आलेल्या ग्रामपंचायती कराड: सैदापूर, काले, वारूंजी, जखीणवाडी, कोपर्डे हवेली, खटाव: निमसोड, पुसेसावळी, चितळी, कातरखटाव, नागाचे कुमेठे, सातारा: गोवे, ठोसेघर, कोडोली, शिवथर, महागाव, नागठाणे, अंगापूर वंदन, वाई: बावधन. खंडाळा: पारगाव, बावडा. माण: वडगाव, किरकसाल, शिरवली, वरकुटे म्हसवड. महाबळेश्वर: भिलार, राजापुरी, कुंभरोशी, क्षेत्र महाबळेश्वर. फलटण: साखरवाडी, होळ, नांदल, वाखरी. कोरेगाव: भोसे, भक्तवडी, त्रिपुटी, शेंदूरजणे, किन्हई, जांब बुद्रुक. जावली : बामणोली. पाटण: कुंभारगाव, कोकीसरे, पेठशिवापूर, धावडे, चोपदारवाडी, सोनवडे. |
सत्तांतर झालेल्या ग्रामपंचायती कराड: बनवडी, पाल, तांबवे, तासवडे, कण्हेगाव, वाहगाव, वाठार, खटाव: कलेढोण, एनकूळ, गुरसाळे, पुसेगाव, निढळ सातारा: पाडळी, कण्हेर, सोनगाव, संगम माहुली, चिंचणेर वंदन वाई: ओझर्डे, केंजळ, गुळुंब, व्याजवाडी, धोम. खंडाळा: भादे, कण्हेरी. माण: गोंदवले बुद्रुक, राणंद, पर्यंती, वडगाव, वाघमोडेवाडी, विरळी, जांभुळणी, शेणवडी, देवापूर. फलटण: राजाळे, विंचुर्णी, घाडगेवाडी, ढवळ. महाबळेश्वर: सौंदरी, कोटोशी. कोरेगाव: वाठार किरोली, पाडळी स्टेशन, देऊर, कठापूर, पेठ किन्हई, ल्हासुर्णे. जावली : पवारवाडी, बेलवडे. पाटण: बांबवडे, उमरकांचण, निगडे, मंदुरे, मानेवाडी, धामणी, त्रिपुडी |