भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे उपअधीक्षक श्रीकांत यांची माहिती
मंदिरातील महासरस्वती, महाकाली मूर्तीवरही करावे लागणार केमिकल कॉन्झरवेशन
प्रतिनिधी / कोल्हापूर
औरंगाबादेतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे रसायनतज्ञ व उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा, केंद्रीय पुरातत्व विभागाचे सिनिअर मॉडयुलर सुधीर वाघ यांनी सोमवारी अंबाबाई मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी अंबाबाईच्या मूर्तीसह मंदिरातील महासरस्वती, महाकालीच्या मूर्तीची शास्त्रीय पद्धतीने पाहणी केली. या पाहणीनंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱयांना काही सुचना केल्या. अंबाबाईची मूर्ती अद्यापही सुस्थितीतच असून तिला 5 वर्षापूर्वी केलेली रासायनिक जतन प्रक्रिया (केमिकल कॉन्झरवेशन) सुद्धा चांगल्या स्थितीतच आहे. मूर्तीची झीजसुद्धा थांबली आहे. मात्र मूर्ती आणखी भक्कम व्हावी, यासाठी तिच्यावर संरक्षित कवच (कॉन्झरवेटीव्ह कोट) मात्र करावा लागेल, असे मिश्रा यांनी देवस्थान समितीला सांगितले.

महासरस्वती, महाकालीच्या मूर्तींची काही प्रमाणात झीज झाली असून दोन्हीही मूर्तीवर रासायनिक जतन प्रक्रिया (केमिकल कॉन्झरवेशन) करून त्यांना सुस्थितीत आणावे लागेल, असेही मिश्रा यांनी देवस्थान समितीला सांगितले. मंदिराच्या बाह्यरंगासह आतील खांब आणि छताचीही पुण्यातील पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलासराव वाहणे यांनी जवळून पाहणी केली. त्यात त्यांना मंदिराच्या बाह्यरंग, अंतरंग, छत, खांबांना कार्बन व धुळ चिकटली असल्याचे निदर्शनास आले. त्यावर एक उपाय म्हणून समितीने लवकरच एक मोहीम हाती घेत संपूर्ण मंदिराच्या बाह्यरंगासह अंतरंगाची स्वच्छ करून घेण्याची सूचना समितीला विलासराव वाहणे यांनी केली.
दरम्यान, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद विभागातील रसायनतज्ञांनी पाच वर्षांपूर्वी अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक जतन प्रक्रिया (केमिकल कॉन्झरवेशन) केले होती. या प्रक्रीयेचे 2017 ला परिक्षण केले होते. त्यानंतर सोमवारी श्रीकांत मिश्रा, सुधीर वाघ यांनी अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी केली. या पाहणीत अंबाबाईची मूर्ती व त्यावर केलेले केमिकल कॉन्झरवेशन सुस्थितीत असल्याचे दिसून आले.
वाहणे यांनी मंदिराचे बाह्यरंग, अंतरग, मातृलिंग परिसर, मंदिराच्या वरील भागावर केलला कोबा, मंदिराचे खांब, त्यावरील शिलालेख यांचीही मिश्रा, वाघ व वाहणे यांनी पाहणी केली. यात या सर्वच ठिकाणी काही प्रमाणात कार्बनबरोबरच धुळीचाही थर बसला असल्याचे दिसून आले. तसेच बऱयाच ठिकाणी झालेल्या दुरवस्थेची डागडुजीही करुन घेण्याची आवश्यकता पुढे आली. त्यासंबंधित महत्वपूर्ण सुचना वाहणे यांनी देवस्थान केल्या.
वाहणे म्हणाले, मंदिरावरील कोब्याचा थर हटवणे हे फार जोखिमेचे काम आहे. हा थर हटवताना देवस्थान समितीला खुप काळजी घ्यावी लागणार आहे. टप्प्या-टप्प्यानेच थर काढावा लागेल. त्यासाठी विविध अंगांनी थराच्या चाचण्या घ्याव्या लागतील. मंदिरावरील 64 योगीनीच्या मूर्तींचीही पाहणी त्यांनी केली. या मूर्तींचीही भविष्यात दुरुस्ती करावी लागेल, असेही त्यांनी सुचित केले. यावेळी देवस्थान समिती सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजी जाधव, कोल्हापुरातील पुरातत्त्व विभागाचे उप आवेक्षक उत्तम कांबळे, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, प्रभारी उपअभियंता सुयश पाटील, लिपिक मिलिंद घेवारी, वास्तुविशारद अमरजा निंबाळकर, उमाकांत राणिंगा, गणेश नेर्लेकर, प्रसन्न मालेकर आदी उपस्थित होते.
अहवाल प्राप्तीनंतरच डागडुजी
अंबाबाई मंदिराच्या शिखरांसह अन्य भागांचे स्ट्रक्चरल ऑडीट केले आहे. मात्र त्याचा अहवाल अद्यापही मिळालेला नाही. तो मिळाल्यानंतर डागडुजीसाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून ते राज्य पुरातत्व विभागाकडे पाठवले जाईल. विभागाकडून अंदाजपत्रकाची छाननी होईल. तसेच डागडुजीची कामे करून घेण्यासाठी ना हरकतीचे प्रमाणपत्र मिळेल. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कामांना सुरुवात केली जाईल. शिवाय कामांसाठी येणारा सर्व खर्च देवस्थान समिती करेल, असेही महेश जाधव यांनी सांगितले.
अहवालानंतरच केमिकल कॉन्झरवेशन…
अंबाबाई, महासरस्वती व महाकाली मूर्तींवर कराव्या लागणाऱया रासायनिक जतन प्रक्रीयेसंदर्भातील अहवाल श्रीकांत मिश्रा व वाघ यांच्याकडून देवस्थान समिती व पुरातत्व विभागाला दिला जाणार आहे. त्याचा अभ्यास करुनच योग्य पद्धतीने मूर्तीवर प्रक्रिया केली जाईल, असे समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूर्तीची पाहणी करताना औरंगाबादेतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे श्रीकांत मिश्रा, केंद्रीय पुरातत्व विभागाचे सिनिअर मॉडयुलर सुधीर वाघ आणि पुण्यातील पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलासराव वाहणे.









