वनविभागाने केली सुखरूप सुटका
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या केळय़े-आंबेकोंड परिसरात शेतात लावून ठेवलेल्य़ा फासकीत बिबटय़ा अडकल्याची घटना सोमवारी समोर आली. त्याविषयी ग्रामस्थांनी दिलेल्या खबरीवरून वनविभागाने त्याठिकाणी तात्काळ धाव घेतली. त्यांनी फासकीत अडकलेल्या बिबटय़ाची सुखरूप सुटका करून त्यांला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
आंबेकोंडवाडी येथील वासुदेव दत्तात्रय अभ्यंकर, यांचे शेतामध्ये फासकीमध्ये बिबटय़ा अडकला असल्याचे तेथील नागरिकांच्या निदर्शनास आले. मोठा बिबटय़ा असल्याचे पाहून तेथील ग्रामस्थांची देखील मोठी घाबरगुंडी उडाली. त्यांनी या घटनेची खबर पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांना दिली. पाटील यांनी तात्काळ त्याबाबत सकाळी 10.00 वाजता दुरध्वनीवरून रत्नागिरी वनरक्षक यांना कळविले. ही खबर मिळताच तात्काळ घटनास्थळी परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी , वनपाल संगमेश्वर, वनपाल पाली व कर्मचारी यांचे समवेत मजगाव ( आंबेकोंडवाडी) येथे जाऊन वस्तूस्थितीची खात्री केली करण्यात आली.
त्यावेळी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱयांना बिबटया फासकीमध्ये अडकल्याचे दिसून आले. फासकीत अडकलेल्या बिबटय़ाला सोडविणे गरजेचे होते. त्यासाठी सर्व यंत्रणा विलंब न लावता कामाला लागली. फासकीमध्ये अडकलेल्या बिबटय़ाला कटरच्या सहाय्यने फासकी तोडून फासकीमधून सुटका करण्यात आली. आणि त्याला पिंजऱयात जेरबंद करण्यात आले. हा बिबटय़ा पाहून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी देखील अचंबित झाले. कारण जेरबंद केलेला बिबटय़ा मादी जातीचा व त्याचे वय अंदाज 10 वर्षांचा असल्याचा बांधण्यात आला आहे. त्या बिबटयास पिंजऱयात घेऊन पशुवैदयकिय अधिकारी, रत्नागिरी-यांचे कडून तपासणी करून घेतली. तो बिबटया सुस्थितीत असल्याचे पशुवैद्यकिय अधिकारी, रत्नागिरी यांनी सांगितले.
त्यानंतर बिबटयास नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आलेले आहे. ही कामगिरी विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दिपक पोपटराव खाडे व सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) सचिन बाबुराव निलख यांच्या मार्गदर्शना खाली परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी श्रीमती प्रियांका लगड, वनपाल पाली गो.पि.कांबळे, वनपाल संगमेश्वर सु.आ. उपरे, वनरक्षक रत्नागिरी श्रीमती मि.म.कुबल, वनरक्षक कोर्ले सा.रं.पताडे, वनरक्षक दाभोळे मिलींद डाफळे, यांनी पार पाडली. यापूर्वी देखील केळये येथे काही वर्षांपूर्वी विषबाधा झालेल्या बिबटय़ाला पकडण्यात आलेले होते. त्यानंतरही या परिसरात बिबटय़ाचे वास्तव राहिलेले आहे. त्यामुळे आता पुन्हा याठिकाणी बिबटय़ा आढळल्याने या परिसरात बिबटय़ाचा अधिवास कायम असल्याचे दिसुन येत आहे.









