निपाणी : सीमालढय़ातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 1956 पासून प्रत्येकवर्षी 17 जानेवारी हा मराठी भाषिकांतर्फे हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. सीमाभाग महाराष्ट्रात सामील करण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा सुरू असून सीमाभाग महाराष्ट्रात सामील होईपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार आहे. 2004 पासून सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून तो अंतिम टप्प्यात आहे. निपाणीत रविवारी मराठी भाषिकांच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी मराठी भाषिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवून हुतात्म्यांना अभिवादन करण्याबरोबरच महाराष्ट्रात जाण्याच्या भावना दाखवून दिल्या. प्रारंभी सकाळी 10 वाजता बेळगाव नाका आवारातील बॅ. नाथ पै चौकात सीमालढय़ातील अग्रणी बॅ. नाथ पै यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच साखरवाडी येथे हुतात्मा कमळाबाई मोहिते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना म. ए. समितीचे जयराम मिरजकर म्हणाले, स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना करताना मराठी भाषिक असलेला हा सीमाभाग तत्कालीन केंद्र सरकारच्या अन्यायामुळे म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन होताना उसळलेल्या दंगलीत अनेकांना हौतात्म्य आले. 1956 पासून मराठी सीमाभाग कर्नाटकात डांबला आहे. अनेक ऐनकेन कारणातून कर्नाटकी जुलूम मराठी भाषिकांवर सुरू आहेत. तरीही येथील नागरिक लोकशाही मार्गाने लढा देताना महाराष्ट्रात जाण्यासाठी एकजुटीने लढत आहेत आणि हा लढा महाराष्ट्रात सामील होण्यापर्यंत सुरूच राहणार आहे.
शिवसेना सीमावासियांच्या पाठीशी
शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे यांनी, शिवसेनेने 100 हुतात्मे दिले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सीमावासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. एप्रिल-मे मध्ये हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते दिल्लीत धडक देणार आहेत. सीमाप्रश्नी आवाज बुलंद करण्याचे काम शिवसेना आणि कार्यकर्ते करणार आहेत, असे सांगितले. निपाणी पालिकेत मराठी भाषिकांची सत्ता असताना देखील एकही नगरसेवक या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित नाही याच्यासारखे दुर्दैव नाही, अशी खंत स्वाभिमानी संघटनेचे प्रा. एन. आय. खोत यांनी व्यक्त केली. सीमालढय़ात बॅ. नाथ पै यांचे बहुमोल योगदान हे सीमावासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील. तसेच हुतात्मा कमळाबाई मोहिते व गोपाळ अप्पू चौगुले यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे ते म्हणाले.









