जगातील दुसऱया क्रमांकाचे शिखर
10 नेपाळी गिर्यारोहकांच्या एका पथकाने इतिहास रचला आहे. या पथकाने जगातील दुसऱया क्रमांकाच्या उंचीचे शिखर के-2 हिवाळय़ात सर करून जागतिक विक्रम नोंदविला आहे. काराकोरम पर्वतरांगेतील या शिखराचे टोक हिवाळय़ात गाठण्यास पहिल्यांदाच यश मिळाले आहे.
हिवाळय़ात 8611 मीटर उंचीचे हे शिखर सर करण्याचा पहिला प्रयत्न 1987-88 मध्ये झाला होता, परंतु कुणीच 7650 मीटरच्या उंचीपर्यंत पोहोचू शकला नव्हता. पण आम्ही शनिवारी संध्याकाळी 5 वाजता शिखरावर पोहोचलो. आम्ही विक्रमी 21 दिवसांत शिखर गाठल्याचे उद्गार या पथकाचे सदस्य निम्स दाई पुर्जा यांनी काढले आहेत. तर नेपाळी गिर्यारोहकांसोबत शिखर गाठण्यासाठी निघालेले स्पेनचे गिर्यारोहक सरगी मिंगोटे यांना मात्र जीव गमवावा लागला आहे. सरगी गिर्यारोहणादरम्यान सी-1 कँपमधून खाली कोसळले होते.
हिवाळय़ात धोकादायक
के-2 शिखर चीन-पाक सीमेवर काराकोरम क्षेत्रात आहे. शिखरावर 6000 मीटरपर्यंत खडक आणि त्यानंतर बर्फ आहे. तापमानही उणे 25 अंश ते उणे 60 अंश सेल्सिअसदरम्यान राहते. तेथे कँप-2 पासूनच धोका सुरू होतो, जो बॉटलनेकपर्यंत वाढत जातो. हे शिखर यशस्वीपणे सर करण्याची शक्यता 30 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.









