सध्या दोन गोष्टींची चर्चा सुरू आहे. एक लसीकरण आणि दुसरी पाठराखण. अर्थात लसीकरणाचे स्वागत आहे आणि घसरत घसरत तळात गेलेल्या राजकारणाची पाठराखण सुरु आहे त्याची किळस येते आहे. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला शनिवारी प्रारंभ झाला. कोव्हीशिल्ड ही सिरम इन्स्टिटय़ूटची लस शनिवारी कोरोना युद्धात आघाडीवर असणाऱया डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांना देण्यास सुरुवात झाली. त्यासाठी सारी सज्जता झाली असली तरी या लसीकरणात ऍपची तांत्रिक अडचण आल्याने काही ठिकाणी हे लसीकरण रेंगाळले आहे. पण तांत्रिक दोष दुरुस्त करून देशभर लसीकरण नियोजनानुसार व निर्धारित वेळेत करायचे असा चंग बांधण्यात आला आहे. राजकारण श्रेयवाद आणि केंद्र-राज्य संबंध असे काही बोचरे किनारे या साऱया प्रकरणात असले तरी लसीकरण आणि कोरोना युद्ध याला अग्रक्रम असल्याने व ती सर्वोच्च गरज असल्याने त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा असे करत एप्रिल-मे पर्यंत ही लस सर्वसामान्यापर्यंत उपलब्ध होईल. पहिला टप्पा कोरोना योद्ध्यांना मोफत देण्यात आला आहे. पुढील टप्पेही मोफत किंवा अल्प किमतीत उपलब्ध व्हावेत अशी अपेक्षा आहे. कोरोनाची ही लस एका व्यक्तीला दोन वेळा द्यावी लागणार आहे. एकदा लस दिली की महिन्याच्या अंतराने दुसऱयांदा द्यावी लागणार आणि त्यानंतर दोन आठवडय़ांनी त्या व्यक्तीच्या शरीरात प्रतिबंधक शक्ती निर्माण होणार असे सांगितले जात आहे. ओघानेच लस आली, लस टोचली म्हणून मास्क काढून टाकला, हाताची स्वच्छता व दोन व्यक्तींतील अपेक्षित सुरक्षित अंतर पाळले नाही असे करून चालणार नाही. यंदाचा पावसाळा संपेपर्यंत कोरोनाचे नियम पाळावेच लागणार आहेत आणि स्वच्छता, हात धुणे वगैरे सवयी कायमच्या लावून घेणे इष्ट होणार आहे. लसीकरणात हिंदुस्थानने घेतलेली आघाडी, केलेले संशोधन व हाती घेतलेली मोहीम देशाची शक्ती, इच्छाशक्ती आणि ज्ञान-तंत्रज्ञान यातील प्रगती अधोरेखित करणारी आहे. ओघानेच त्यासाठी काम करणाऱया सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व लस निर्मात्यांचे आणि ती सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी काम करणाऱया यंत्रणेचे कौतुक केले पाहिजे. अभिनंदन केले पाहिजे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी किंवा नजीकच्या काळात यातील अग्रेसर व्यक्तींना सन्मानित केले पाहिजे आणि लढाईत जे योद्धे धारातीर्थी पडले त्यांनाही मानवंदना दिली पाहिजे. एकीकडे हा लसोत्सव सुरू आहे. आगामी काळात त्याला गती येणार आणि कोरोनामुळे आवळलेले विश्व हळूहळू मुक्त होणार. या लसीकरणाचे सर्वस्तरावर स्वागत होत आहे आणि झालेही पाहिजे पण याचवेळी महाराष्ट्रात राजकारणात जो धुडगूस सुरू आहे, राजकारणाची घसरण सुरु आहे. ती राजकारण किती हीन पातळीवर गेले आहे याची लक्तरे दाखवते आहे. राज्याचे सामाजिक कल्याण मंत्री धनंजय मुंडे हे नेते म्हणून कितीही चांगले काम करत असले आणि राज्यात व बीड-परळीत लोकप्रिय असले तरी त्यांचे जे प्रकरण पुढे आले आहे, त्यांनी स्वतः जी कबुली दिली आहे आणि समाजमाध्यमांवर त्यांचे जे फोटो व्हायरल झाले आहेत ते पाहता त्यांचा तात्काळ राजीनामा घेणे आणि राज्यातील राजकारणाची आणि पक्षांचीही प्रतिष्ठा सांभाळणे गरजेचे हेते. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार आणि स्वतः धनंजय मुंडे यांचेकडून ती अपेक्षा होती. पण आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंडे यांची पाठराखण करताना दिसतो आहे. अशी पाठराखण सर्वस्वी दुर्दैवी आणि अशोभनीय आहे. राजकारणाला तळागाळात नेणारी आहे. कायदा-सुव्यवस्था बुडवणारी आहे व नीतीमत्ता खुंटीवर टांगणारी आहे. पण याचे कोणालाच सोयरसुतक नाही. जो तो सोयरे संबंध, नाती व स्वार्थ साधतो आहे. धनंजय मुंडे भाजपाच्या मुशीत तयार झालेले नेते आहेत. त्यांचा विवाह झाला असून त्यांना पत्नी, तीन मुले आहेत. धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दिले त्यामध्ये हे पाच जणांचे अधिकृत कुटुंब नोंद आहे. तथापि, धनंजय मुंडे यांचे करुणा शर्मा या महिलेशी गेली पंधरा वर्षे संबंध आहेत. त्यांचेपासून या महिलेला दोन मुले झाली आहेत. ती धनंजय मुंडे यांचे नाव लावून शाळा शिकत आहेत आणि त्यांचे पालन मुंडे करत आहेत हे स्पष्ट झाले आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन दिलेली ही माहिती आहे. या करुणा शर्माची लहान बहीण रेणू शर्मा हिने पोलिसांत मुंडे यांनी आपला गैरफायदा घेतला, बलात्कार केला, खोटी आश्वासने दिली अशी तक्रार केली आहे. हा हनीटॅप आहे असा आरोप केला जातो आहे. रेणू शर्मा विरोधात आणखी तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणांची चौकशी होईल पण करुणा शर्माचे काय,मुंडेंनीच कबुली दिली आहे की या महिलेला झालेल्या दोन मुलांची निवडणूक आयोगाला माहिती दिलेली नाही. करुणा आणि रेणू शर्मा हे एकूण प्रकरणच संशयास्पद, गंभीर, अनैतिक दिसते आहे. ओघानेच मुंडे यांना मंत्रीपदावरुन पायउतार करुन या सर्वाची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. आता राज्यभर आंदोलने सुरु झाली आहेत. उच्च न्यायालयात वेगवेगळय़ा याचिका दाखल होतील व मुंडे यांना पायउतार व्हावे लागेल या सर्वांचा फटका राजकारणाला, महाआघाडी सरकारला व राष्ट्रवादी काँग्रेसला बसेलच. पण आज अनेकांनी मौन पाळले आहे. त्याचे कारण घरोघरी मातीच्या चुली हेच आहे. धनंजय मुंडे उघडे पडले आहेत. अनेकांची झाकली मूठ सव्वा लाखाची आहे. यातील सर्वपातळीवर सच्चाई बाहेर आली पाहिजे. राजकारण, समाजकारण नितळ, पारदर्शी, चारित्र्यसंपन्न असले पाहिजे.
Previous Articleहरवलेले शब्द वगैरे
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








