पायरी मार्ग परिसरात बाटल्यांचा खच; दुर्ग प्रेमींकडून नाराजी
परळी / वार्ताहर :
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा म्हणून सज्जनगड किल्ला ओळखला जातो. आज देखील इतिहासाच्या पाऊल खुना याठिकाणी पहायला मिळतात. मात्र, शहरातील दररोजच्या आयुष्याला कंटाळून निसर्गाच्या सानिध्यात पार्टी करण्याच्या मानसीकतेमुळे सज्जनगड परिसरात (पायरीमार्ग) मद्यपिंचा राजरोसपणे वावर हा वाढत आहे. तरी पोलिसांनी सज्जनगडसारख्या पवित्र अशा ठिकाणी मद्य प्राशन केले जाणार नाही ,याची दक्षता घेण्याची तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी परळी खोऱ्यातील दुर्गप्रेमी करत आहेत.
परळी खोऱ्यातील निसर्ग संपदेमुळे शहरातील रटाळ आयुष्य जगणारे नागरिक हे या भागात फिरण्यास तसेच पार्टीच्या नियोजनानेच दाखल होत असतात. मात्र, निसर्गाचा आनंद घेत असताना ऐतिहासीक जागेचे भान ही विसरत असल्याने मद्यपींचा धिंगाणा स्थानिकांना डोकेदुखी ठरत आहे. तसेच पोलिसांनी उरमोडी धरण परिसर, सज्जनगड पायरी मार्ग अशा ठिकाणी गस्त घालून ऐतिहासिक वास्तूची अवहेलना होणार नाही, याची काळजी घेण्याची विनंती दुर्गप्रेमी तसेच स्थानिक नागरिक करत आहेत.
पार्टीबहाद्दरांमुळे पायरी मार्ग परिसरात बाटल्यांचा खच
सज्जनगड पायरी मार्ग हा तसा कमी वर्दळीचा अन् निवांत त्यामुळे मित्रमंडळी गोळा करुन शहरातून पार्सल घेऊन या परिसरात पार्ट्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मद्यप्राशनकरुन बाटल्या इतरत्र टाकणे तसेच खाद्य पदार्थांचे कागद ही तसेच टाकले जात असल्याने परिसरात बाटल्या अन् कचरा दिसून येत आहे.









