सातारा / प्रतिनिधी :
देशात कोरोना लसीकरणास आज प्रारंभ झाला असून, साताऱ्यात पहिल्या लसीकरणाचा मान जिल्हा रुग्णालयातील एक्सरे टेक्निशियन बाळासाहेब खरमाटे यांना मिळाला. लसीकरणानंतर कोणताही त्रास झाला नसल्याचे खरमाटे यांनी सांगितले.
सातारा जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते फीत कापून लसीकरणास प्रारंभ झाला. साताऱ्यात 9 ठिकाणी आज लसीकरण होणार असून, प्रत्येक ठिकाणी 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. कोविशिल्ड या लसीचे 5ml चे डोस दिले जात असून, डोस दिल्यानंतर 30 मिनिटे त्यांना देखरेखीखाली वेगळ्या खोलीत ठेवले जात आहे.
या उदघाटन प्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम ,सिव्हिल सर्जन सुभाष चव्हाण, जिल्हापरिषद अध्यक्ष काबूले, जिल्हा आरोग्यधिकारी अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.









