समीक्षक चंद्रकांत जोशी यांचे मत : वरेरकर नाटय़ संघातर्फे के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शनाचे उद्घाटन
प्रतिनिधी / बेळगाव
चित्रकला ही व्यक्तीच्या अंतर्मनातून उत्स्फूर्तपणे बाहेर येते. जे सुंदर आहे ते अधिक सुंदर करून रेखाटण्याची कला चित्रकार करत असतो. पाण्यासारखे प्रवाहीपण आणि पाण्याचा नितळपणा स्वच्छपणे ज्याला मांडता येतो तो खरा प्रतिभावंत होय, असे विचार कोल्हापूरच्या कलानिकेतन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी व्यक्त केले.
वरेरकर नाटय़ संघातर्फे शुक्रवार दि. 15 ते 17 जानेवारी दरम्यान संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये राजेशकुमार मौर्य, उदयोन्मुख चित्रकार हेमकुमार टोपीवाला यांच्या चित्रांची व नम्रता मौर्य यांच्या फॅशन फोटोंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर चंद्रकांत जोशी बोलत होते. व्यासपीठावर तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, मौर्य यांचे गुरु सी. एस. पंत, अंजली पंत, नम्रता मौर्य, हेमकुमार टोपीवाला व जगदीश कुंटे उपस्थित होते.
चंद्रकांत जोशी पुढे म्हणाले, राजेशकुमार यांनी आडनावाप्रमाणे चित्रकलेमध्ये साम्राज्य उभे केले आहे. सतत आकाशात झुलवत ठेवणाऱया या माणसाने रात्रीचा दिवस करून चित्रकला जोपासली आहे. कला ही आतून बाहेर येते. चित्रकलेसाठी निसर्ग वाचवावा लागतो. तो मनात झिरपावा लागतो. ज्ञानशाखेच्या अंतिम टोकाला गेल्यावर जे सापडले आहे ते मी देतो आहे, अशी चित्रकाराची भावना असावी. यासाठी गुरुची शिकवणही महत्त्वाची आहे. कारण देव डोळे देतो, गुरु दृष्टी देतो, असेही चंद्रकांत जोशी यांनी नमूद केले.
राजेशकुमार मौर्य यांनी लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्यामुळे याकडे वळलो. मात्र रात्रीच्यावेळीच चित्रे रेखाटण्यास वेळ मिळतो. त्यामुळे रात्री उगवणारी चांदणी हीच माझ्यासाठी अधिक प्रकाशदायी आहे. माझे गुरु सी. एस. पंत यांनी मला कागदावर पाणी कसे उतरवावे हे शिकविले. बेळगावला आल्यावर माझ्या चित्रकलेला प्रोत्साहन मिळाले आणि दीड वर्षात 400 हून अधिक चित्रे रेखाटली आहेत, असे सांगितले. सी. एस. पंत यांनी, बेधडकपणे कागदावर रंग उधळण्याचे मौर्य यांचे धाडस कौतुकास्पद आहे. त्यांनी चित्रकलेत स्वतंत्र शैली जोपासली आहे, असे सांगितले.
तरुणाईला संधी मिळावी यासाठीच के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी सुरू
अध्यक्षीय समारोप करताना किरण ठाकुर म्हणाले, मौर्य यांच्याकडे उत्तम रंगसंगतीची दृष्टी आहे. म्हणूनच विमानतळावरसुद्धा त्यांनी खूप आकर्षक चित्रे लावली आहेत. नम्रता मौर्य यांनी फॅशन फोटोग्राफी हे वेगळेच क्षेत्र निवडले असून त्यांची फोटोग्राफी उत्कृष्ट आहे. तरुणाईला संधी मिळावी यासाठी के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी सुरू झाली आहे. कारण गुणांची कदर व्हावी, ही शिकवण आपल्याला कोरोनाने दिली आहे. कलाकारांनी या गॅलरीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.