दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष : वाहनधारकांचे हाल
आंबेवाडी गावापासून कडोली आणि हिंडलगा पंपींग स्टेशनपासून आंबेवाडी गावाला जोडणाऱया संपर्क रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पण लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने साफ दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सदर रस्त्याबाबत चर्चा करण्यासाठी देवस्की पंच कमिटी, एक्स सर्व्हिसमेन असोसिएशन व ग्रामस्थांच्यावतीने नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गेल्या काही वर्षापासून आंबेवाडी ते कडोली हा संपर्क रस्ता पूर्णतः खराब होऊन देखील साधी दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून वाहनधारकांचे हाल होत आहेत. तर हिंडलग्यापासून गावाला जोडणारा मुख्य रस्ता मार्कंडेय नदीला आलेल्या पुरामुळे मोठय़ा प्रमाणात खचला आहे. शिवाय येथून प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी लवकरात लवकर दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी बैठकीत ग्रामस्थांनी
केली.
यावेळी मल्लाप्पा तरळे, लक्ष्मण तरळे, मारुती कणबरकर, बाबल मन्नोळकर, कृष्णा मजुकर, मनोहर राक्षे, गंगाराम चौगुले, शांताराम तरळे, विठ्ठल राक्षे, पुंडलिक अतिवाडकर, कृष्णा मन्नोळकर, कृष्णा शहापूरकर, कृष्णा मुतगेकर, अर्जुन राक्षे, नारायण लोहार, लक्ष्मी यळगुकर, लक्ष्मी कोवाडकर, सुधा ढोपे, संगिता अंबेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.









