बी. के. मॉडेलमध्ये द्वितीय भाषा इंग्रजी विषयाची कार्यशाळा
प्रतिनिधी / बेळगाव
भाषा हे संपर्काचे माध्यम असून आपल्या भावना आणि संवादाचे उत्तम स्त्रोत आहे. शब्द भांडार वाढवून स्पर्धेच्या सहभागातून ज्ञान वाढविण्यास मदत करा आणि इंग्रजीला अलंकाररुपी सजवा, असे उद्गार बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी काढले. बी. के. मॉडेल येथे कन्नड व मराठी माध्यमाच्या द्वितीय भाषा इंग्रजी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका एस. ए. चाटे उपस्थित होत्या. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, समन्वयक अधिकारी रेखा नायक, इंग्रजी विषय शिक्षक संघाचे शहराध्यक्ष मेघशाम भोसले, विषय तज्ञ आरपीडी महाविद्यालयाचे प्रा. मायाप्पा पाटील, भरतेश हायस्कूलच्या शिक्षिका प्रमिला समाजी उपस्थित होत्या.
प्रारंभी आर. आय. गुरव यांच्या क्रांतीगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक एस. ए. चाटे यांनी केले. पाहुण्यांचे मेघशाम भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर एकनाथ पाटील यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांच्या हस्ते रोपटय़ाला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना एकनाथ पाटील यांनी भाषेचे अस्तित्व, भाषेचे अंतरंग याबाबत सविस्तर मत व्यक्त करत शिक्षक या नात्याने भाषेचे सखोल अभ्यास, वाचन, चिंतन, मनन व लिखाणाचे महत्त्व पटवून दिले. जिल्हा शिक्षणाधिकाऱयांनी जिल्हय़ाच्या निकाल वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा विषय तपासणी अधिकारी मृणालिनी पाटील उपस्थित होत्या.
प्रा. मायाप्पा पाटील व प्रमिला सामजी यांनी इंग्रजी विषयात येणाऱया अडचणांबरोबरच आवड निर्माण करण्यासाठी क्लृप्त्यांचे विवेचन केले. सूत्रसंचालन दीपम पाटील यांनी केले. आभार रवी घाटगे यांनी मानले. यावेळी शहरातील मराठी व कन्नड माध्यमांच्या शिक्षकांचा सहभाग होता.









