प्रतिनिधी / इस्लामपूर
वार बुधवार…वेळ सायंकाळची…ताकारी रस्त्याला पोलिसांची गस्त.. इतक्यात नियंत्रण नसलेला एस.टी. मालवाहतूक ट्रक वाकडा-तिकडा आला. पोलिसांनी पाठलाग करुन ट्रक अडवला. तेव्हा चालक सुर्यकांत तुकाराम सोलनकर ( २६ रा विठ्ठलनगर, शेगावरोड जत) हा दारूच्या नशेत असल्याचा आढळून आला. त्याच्यावर कारवाई केली. पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला.
इस्लामपूर-ताकारी रस्त्यावर हॉटेल कोकोस जवळ बुधवारी सायंकाळी इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेडगे, पोलीस नाईक अरुण पाटील यांच्यासह अन्य कर्मचारी गस्त घालत होते. दरम्यान साडे पाच वाजण्याच्या सुमारास एस. टी. मालवाहतूक ट्रक वेडावाकडा चालवत जाताना दिसला. पोलीसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला. पण तो न थांबता निघून गेला.
पोलीसांनी पाठलाग करून एसटी माल वाहतूक ट्रक क्रमांक एमएच १४ बी.टी ०४१४ हा अडवला. त्यावेळी चालक सोलनकर याने मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. त्याला वाहनासह ताब्यात घेवून त्याची वैद्यकीय तपासणी केली असता, त्याने मद्यप्राशन केल्याचे प्रमाणपत्र उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले. याप्रकरणी अरुण पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात सरकार तर्फे त्याच्याविरुद फिर्याद दिली. त्याच्यावर भा.द वि.कलम २७९ व मो.वा.का. कलम १८५ प्रमाणे कारवाई करण्यात आली.