जिल्हाधिकाऱयांनी केला डॉक्टर-तंत्रज्ञांचा सत्कार
प्रतिनिधी/ बेळगाव
येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (बिम्स) ने गेल्या आठवडय़ात 1 लाख आरटीपीसीआर तपासणी पूर्ण केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते बिम्समधील मायक्रोबायोलॉजी विभागातील डॉक्टर, कर्मचारी व तंत्रज्ञांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते आरटीपीसीआर नोडल अधिकारी डॉ. रुपाली संतोष शिंदे, मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. महांतेश परांडे, डॉ. आईशा परांडे, डॉ. ज्ञानेश्वर यांच्यासह सुमारे 50 हून अधिक जणांचा सत्कार करण्यात आला. बिम्समध्ये बुधवारी सकाळी सत्काराचा हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकाऱयांनी येथील डॉक्टर व कर्मचाऱयांच्या योगदानाचे कौतुक केले.
बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश दंडगी, मुख्य प्रशासकीय अधिकारी सैयद आफ्रीनबानु बळ्ळारी आदींच्या उपस्थितीत मायक्रोबायोलॉजी विभागात कोरोना महामारीच्या काळात उत्तमरीत्या सेवा बजावलेल्या डॉक्टर व कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला.
बेळगावात सुरुवातीला केवळ आयसीएमआरमध्ये कोरोना तपासणीसाठी परवानगी मिळाली होती. नंतर बिम्समध्येही सरकारने ही सुविधा उपलब्ध केली. जिह्यात कोरोनाचा फैलाव वाढत होता. त्यावेळी येथील डॉक्टर व कर्मचाऱयांनी आरटीपीसीआर तपासणीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.









