नृगराजाने मोठे दानकर्म केले तरीही तो संकटात कसा सापडला हे स्वमुखाने सांगताना राजा पुढे म्हणतो –
मार्गी नेतां तरुण धेनु । कळपाविहीन पारिके रान।
देखूनि पळाली त्यापासून । मम गोधनीं पुन्हां आली ।
मज हें कळलें नसतां कांहीं । म्यां ते धेनु दावप्रवाहीं।
आणिका ब्राह्मणा दिधलीं पाहीं ।
एके दिवशी एका तपस्वी ब्राह्मणाची एक चुकलेली गाय माझ्या गायीमध्ये येऊन मिसळली. मला याची कल्पना नव्हती. मी नकळत ती गाय दुसऱया एका ब्राह्मणाला दान दिली.
स्वाश्रमा तोही ते नेतां । पूर्वीं जयासी दिधली दान ।
मार्गीं भेटला तो ब्राह्मण । तेणें आणिला तो पडखळून।
चोर म्हणून मजपाशीं ।पूर्व ब्राह्मण म्हणे हे माझी ।
नृगें मज दिधली द्विजसमाजीं । द्वितीय म्हणे प्रत्यक्ष आजी ।
दान घेतलें म्या ईचें ।हस्तीचें वाळलें नाहीं जळ ।
कंठीं नृपार्पितसुमनमाळ । ललाटीं आर्द गंध केवळ।
चौर्यशील केंवि माझें ।ऐसें ब्राह्मण परस्परें ।
भांडतां वदती परुषोत्तरें । आपण निर्दोष ऐसे खरें ।
प्रतिपादविती तें ऐका ।
जेव्हा ती गाय तो ब्राह्मण घेऊन चालला, तेव्हा त्या गाईचा मूळ मालक त्याला म्हणाला, ‘ही गाय माझी आहे. दान घेणारा ब्राह्मण म्हणाला, ही माझी आहे. कारण नृग राजाने मला ही दान दिली आहे.
साधावया आपुला स्वार्थ । दोघे कथिती निज वृत्तान्त।
तूं दाता कीं हर्ता येथ । हें ऐकोनि भ्रान्त मी झालों ।
माझे धेनूचें अपहरण । केलें म्हणे पूर्व ब्राह्मण ।
दुजा म्हणे मीं घेतलें दान । मघ्यें कोण तस्कर हा ।
पूर्व ब्राह्मण म्हणे तूं तस्कर । माझे धेनूचा अपहार ।
करूनि दातृत्व मिरविसी थोर । पापाचार हा राया ।
दुजा म्हणे तूं दानशूर । स्वधनें संपन्न जेंवि कुबेर ।
तुज हा ब्राह्मण म्हणे तस्कर । मूर्ख पामर मतिमंद ।
पहिला म्हणे धेनूसाठीं । नृपाची भाटींव करिसी वोठीं।
ब्रह्मस्वहरणीं बुद्धि खोटी । दुष्ट कपटी हा राजा ।
ऐसे ब्राह्मण भांडती निकरें । ऐकोनि तयांचीं क्रूरोत्तरें।
भ्रमें माझें चित्त घाबरें । बुद्धि न थरे स्वस्थानीं ।
ते दोघे ब्राह्मण आपापसात भांडण करीत आपलेच म्हणणे खरे आहे, हे पटविण्यासाठी माझ्याकडे आले. एकजण म्हणाला, ही गाय आपण मला दिली आहे; व दुसरा म्हणाला, असे असेल तर तू माझ्या गाईची चोरी केली आहेस. ते ऐकून माझे चित्त गोंधळून गेले. मला कळेना की हे काय चालले आहे?
सुकृताचरणीं विघ्नघाला । स्वधर्मकरिता अधर्म घडला ।
कांहीं बोलों न शकें बोला । शरण विप्रांला मग आलों।
ग्लानिपूर्वक दण्डवतीं । विप्रां केली विनीत विनति।
तेही अल्पसी यथामति । कथितों श्रीपति अवधारिं।
Ad. देवदत्त परुळेकर








