चाहत्यांकडून सोशल डिस्टंन्सिगला हरताळ : मास्कही गायब : बंपर ओपनिंग
चेन्नई/ वृत्तसंस्था
विजय आणि विजय सेतुपति यांचा तमिळ ऍक्शनपट ‘मास्टर’ला चित्रपटगृहांमध्ये बंपर ओपनिंग मिळाले आहे. कोरोनाकाळात प्रदर्शित झालेला हा चित्रपट चाहत्यांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यास यशस्वी ठरला आहे. तसेच याचे सर्व शो देखील हाउसफुल्ल ठरत आहेत. परंतु चित्रपटगृहांबाहेर तसेच आत कोरोनाविषयक दिशानिर्देशांना पायदळी तुडविले जात आहे.
प्रेक्षकांनी एक दिवस अगोदरच तिकीट खिडकीबाहेर लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. चित्रपट प्रदर्शित होताच केवळ तामिळनाडू नव्हे तर मुंबईतील चित्रपटगृहांमध्येही चाहत्यांची मोठी गर्दी दिसून आली आहे. स्वतःच्या पसंतीच्या अभिनेत्यांच्या चित्रपटाचा जल्लोष करताना या चाहत्यांना कोरोना महामारी अद्याप पूर्णपणे संपलेली नसल्याचा विसर पडला आहे. या चाहत्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच मास्कही वापरलेला नाही.
बॉक्स ऑफिसवर त्सुनामी
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणणारा ठरला आहे. मास्टरला जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. चाहत्यांना जे आवडते, ते द्या, मग ते तुम्हाला निराश करणार नाहीत. उत्तमपद्धतीने तयार करण्यात आलेल्या चित्रपटाला मोठय़ा पडदय़ावर पाहण्याची उत्सुकता कधीच संपणार नसल्याचे उद्गार ट्रेंड ऍनालिस्ट तरन आदर्श यांनी काढले आहेत.
तीन भाषांमध्ये प्रदर्शित
मंगळवारी पोंगलनिमित्त लोकेश कनागराज यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘मास्टर’ तमिळसह तेलगू आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित झाला आहे. हिंदी भाषेतील चित्रपट 14 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये विजय आणि विजय सेतुपतिसह मालविका मोहनन, शांतनू भाग्यराज, अर्जुन दास व नसर यांच्या भूमिका आहेत.