ट्रम्प यांच्याकडून वॉशिंग्टनमध्ये आणीबाणी लागू
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांच्यातील वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. स्वतःविरोधात अमेरिकेच्या संसदेत सादर करण्यात आलेल्या महाभियोगाच्या प्रस्तावानंतर ट्रम्प यांनी राजधानी वॉशिंग्टनमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. वॉशिंग्टनमध्ये 20 जानेवारी रोजी बायडेन हे अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. अशा स्थितीत ट्रम्प यांच्या आणीबाणीच्या घोषणेवरूनही जोरदार राजकीय संघर्ष होण्याची तीव्र शक्यता आहे.
बायडेन यांच्या शपथविधीपूर्वी आणि त्यादरम्यान हिंसाचार होण्याची भीती असल्याने ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राजधानीत ट्रम्प समर्थकांच्या हिंसेवरून स्थानिक पोलीस तसेच संघीय तपास अधिकाऱयांनीही चिंता व्यक्त केली आहे. या सर्व प्रकारामुळे बायडेन तसेच कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळय़ावर संकटाचे ढग घोंगावू लागले आहेत.
24 जानेवारीपर्यंत आणीबाणी
अध्यक्षांच्या या निर्णयामुळे गृह मंत्रालय (डीएचएस) आणि संघीय आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला (फेमा) दिलासा प्रयत्नांचे समन्वय करण्याची अनुमती मिळाल्याचे विधान व्हाईट हाऊसने केले आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये आणीबाणी सोमवारपासून लागू झाली असून ती 24 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे.
आणीबाणीची पार्श्वभूमी
व्हाईट हाऊसनुसार आणीबाणी घोषणा आवश्यक आपत्कालीन उपाययोजनांसाठी योग्य सहाय्यही प्रदान करते. यांतर्गत लोकांचा जीव वाचविणे आणि मालमत्ता तसेच सार्वजनिक आरोग्य अन् सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. यांतर्गत विशेषत्वे फेमाला आवश्यक सुविधा प्रदान करण्यासाठी अधिकृत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
संघीय निधीतून सुरक्षा
आणीबाणीच्या काळातील सुरक्षा उपाययोजना प्रत्यक्ष संघीय सहाय्यापर्यंत मर्यादित असून त्याकरिता 100 टक्के निधी संघीय कोषातून प्रदान केला जाणार आहे. डीएचएसचे थॉमस जे फारगियोन आणि फेमाचे प्रशासक पीट गेनोर प्रभावित क्षेत्रात अभियान संचालनासाठी संघीय समन्वय अधिकारी आहेत.
हिंसाचाराची भीती अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष बायडेन यांनी सूत्रे स्वीकारण्याच्या काही दिवसांपूर्वी वॉशिंग्टनसह सर्व 50 राज्यांच्या राजधान्यांमध्ये शस्त्रांसह निदर्शने आयोजित होणार असल्याचा इशारा एफबीआयने दिला आहे. तर युएस नॅशनल गार्ड्स ब्युरोनेही पुढील आठवडय़ात दंगली होण्याची भीती व्यक्त केली आहे.









