65 कोटी लोकापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य : कूपन अन् पावतीद्वारेच घेतली जाणार देणगी : घरोघरी पोहोचणार पथक
वृत्तसंस्था / अयोध्या
अयोध्येत उभारण्यात येणाऱया भगवान श्रीराम यांच्च्या भव्य मंदिरासाठी निधी संकलनाचे काम 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हा कार्यक्रम 42 दिवसांचा असून 27 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा रोजी समाप्त होणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने याला ‘राम मंदिर निधी समर्पण अभियान’ नाव दिले आहे.
देशातील 5.25 लाख गावांमधील 65 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य या मोहिमेकरता बाळगण्यात आले आहे. या मोहिमेकरता प्रत्येक राज्यात पथके स्थापन करण्यात आली आहेत. मध्यप्रदेशात 6.5 कोटी आणि बिहारमध्ये 7.5 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. याचप्रकारे उर्वरित राज्यांनीही स्वतःचे लक्ष्य निश्चित केले आहे.
देणगीचे स्वरुप
सद्यकाळात तीन प्रकारे देणगी प्राप्त केली जाणार असून यात कूपन, पावतीद्वारे आणि थेट खात्यात रक्कम जमा करता येणार आहे. ट्रस्टच्या वतीने कूपन आणि पावत्या राज्यांमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. 10, 100 आणि 1 हजार रुपयांची कुपन्स असतील. 100 रुपयांची 8 कोटी, 10 रुपयांची 4 कोटी तर 1000 रुपयांचे 12 लाख कूपन्स छापली जातील. याहून अधिक देणगी देण्याची इच्छा असल्यास तो पावतीद्वारे देऊ शकतो, त्याकरता कुठलीच मर्यादा नाही. कुपनवर भगवान राम आणि मंदिराचे चित्र असेल. पावतीच्या माध्यमातून देणगी देणाऱयांना एक पत्रक तसेच भगवान राम यांचे चित्र भेट करण्यात येणार आहे. पत्रकावर मंदिराच्या इतिहासासंबंधी माहिती असेल, जी हिंदी, इंग्रजीसह राज्यांच्या मातृभाषेत असणार आहे.
मोठी रक्कम देणगीदाखल देणाऱया लोकांना पत्रक आणि चित्रासह स्मृतीच्या स्वरुपात अंगवस्त्र, कॉफी टेबल यासारख्या गोष्टी भेटवस्तूच्या स्वरुपात प्राप्त होतील. परंतु हे अनिवार्य नसेल. राज्याच्या पातळीवर हा निर्णय घेण्यात येणार आहे.
पारदर्शकतेची खबरदारी
देणगी किंवा कूपन आणि पावतीद्वारेच प्राप्त केली जाईल. ग्रामीण क्षेत्रांमध्ये 24 तास तर शहरी क्षेत्रांमध्ये 48 तासांच्या आत जमा करण्यात आलेली रक्कम बँकेत भरावी लागणार आहे. बँकांमध्ये रक्कम जमा करण्यासाठी स्वतंत्र डिपॉझिट स्लिप छापण्यात आल्या असून ज्यावर कोड नंबर आहे. ही रक्कम केवळ स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदामध्ये जमा होणार आहे. या तिन्ही बँका जमा रक्कमेसाठी कलेक्शन अकौंटचे काम करतील. तेथून पैसे काढता येणार नाहीत.
व्यापक प्रशिक्षण
मोहिमेकरता नियुक्त प्रत्येक पथकात 5 जण असतील, ज्यातील एका सदस्याकडे नेतृत्व असणार आहे. त्याच्याकडे कूपन तसेच पावत्या असतील. याचप्रकारे प्रत्येक 5 पथकांमागे एक डिपॉझिटर असेल. तोच बँकेत जाऊन रक्कम जमा करणार आहे. या मोहिमेत सामील लोकांना प्रत्येक स्तरावर प्रशिक्षण दिले जात आहे. देशभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात पथकांचे संचालन, हिशेबलेखन, बँकांमध्ये पैसे जमा करणे, प्रचार-प्रसार करणे यांचा समावेश आहे. या विषयांशी संबंधित तज्ञ प्रशिक्षण देत आहेत.
राज्यात जिल्हानिहाय व्यवस्था
सर्व राज्यांमध्ये जिल्हा पातळीवर एक समिती असेल. अनेक राज्यांमध्ये गटस्तरावरही समित्या असणार आहेत. तसेच याकरता प्रत्येक जिल्हय़ात एक कार्यालयही असणार आहे. काही राज्यांमध्ये कार्यालय स्थापन करण्यात आले असून अनेक ठिकाणी याची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक गाव किंवा गल्लीत गरजेनुरुप पथके स्थापन केली जातील. एखाद्या गावात 5-6 पथकेही असू शकतात.
विदेशातून सध्या देणगी नाही
सद्यकाळात विदेशातून देणगी प्राप्त केली जाणार नाही. ट्रस्टकडे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्टची (एफसीआरए) मान्यता नसल्याने हे सध्यातरी शक्य नाही. परंतु ही मान्यता मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच सध्या केवळ रोख पैसेच स्वीकारण्यात येतील. दागिने, धान्य किंवा अन्य मालमत्ता स्वीकारली जाणार नाही. या गोष्टी दान करू पाहणाऱयांना त्यांची विक्री करून पैसे जमावे करावे लागतील.









