खानापूर / वार्ताहर
खानापूर तालुक्यात दिव्यांगांची संख्या जवळपास 4500 पेक्षा अधिक आहे. अनेक दिव्यांग व्यक्ती शासकीय सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत. यासाठी खानापूर तालुक्मयात विशेष योजना राबवून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी खानापूर तालुका अंगविकलांग संघटनेच्यावतीने कर्नाटक राज्याच्या महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, खानापूर तालुका हा मागासलेला व विस्तारित तालुका आहे. या तालुक्मयात दिव्यांगांसाठी तालुक्मयात जवळपास दोन एकर जागा मंजूर करण्यात यावी. या जागेवर त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र, शैक्षणिक सुविधा, वसतिगृहांची उभारणी करण्यात यावी, यासाठी विशेष अनुदान मंजूर करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या अनेक मासिक पेन्शन, बसपास योजना, सार्वजनिक तालुका आरोग्य केंद्रांमध्ये दिव्यांग वैद्यकीय अधिकाऱयांची नेमणूक करावी, शासनाच्या प्रत्येक योजनेतून दिव्यांगांसाठी 5 टक्के अनुदान मंजूर करण्यात यावे, समृद्धी अंगविकल योजनेमधून 10 हजार रुपये सहाय्यधन मिळवून देण्यात यावे. त्याबरोबर व्ही. आर. डब्ल्यू. कार्यक्रमांतर्गत प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयेत मासिक मानधन मिळून देण्यात यावे, अशी मागणीदेखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देताना तालुका अंगविकल संघटनेचे अध्यक्ष अनिल सावंत, पदाधिकारी बसवराज गावडा, लक्ष्मण मुत्तेनहट्टी, गोपाळ मडवाळकर, लक्ष्मण कालमणकर, वसंत घाडी, पांडुरंग गुरव, मष्णू, शिवाजी पवार यासह इतर उपस्थित होते.









