प्रतिनिधी/मिरज
केरळस्थित डीओस्मीओ कंपनीत पैसे गुंतवल्यास दामदुप्पट करून देण्याचे अमिष दाखवून महंमद नौशाद (रा. कन्नूर, जि. कासरगौड) या भामट्याने सांगली-मिरजेसह कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिह्यातील पाच जणांना सुमारे एक कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. कंपनीचे वेगवेगळे प्लॅन सांगून त्यामाध्यमातून पैसे दुप्पट करण्याचे अमिष दाखवत नौशाद याने फसवणूक केल्याची तक्रार भारती अरविंद तेरदाळ (वय 42, रा. अल्फोन्सा लोटस अपार्टमेंट, कुपवाड रोड, मिरज) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात दिली आहे.
तेरदाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डीओस्मीओ कंपनीचा तथाकथित व्यवस्थापकीय संचालक महंमद नौशाद याने तेरदाळ यांच्यासह अन्य पाच जणांना कंपनीत पैसे गुंतवल्यास ते ठराविक दिवसात दाम दुप्पट आणि दीडपट करुन देण्याचे अमिष दाखविले. या अमिषाला बळी पडून तेरदाळ यांच्यासह राजमती प्रकाश मगदूम (रा. इनामधामणी), किरण हणमंत बैरागी (रा. तुलसीदास राम मंदिर, मिरज), अशोक जीवबा गुरव (हरळी, ता. गडहिंगलज), ऋतुजा रमेश नार्वेकर (रा. वेंगुर्ला) यांनी 25 जुलै 2018 पासून आजपावेतो वेळोवेळी 92 लाख, 3 हजार, 320 रुपये दिले आहेत.
मात्र, त्या बदल्यात सांगितल्याप्रमाणे दुप्पट अथवा दीडपट रक्कम न देता अल्पस्वरुपात परतावे देऊन फसवणूक केली आहे. या पाच जणांनी आजपर्यंत वेळोवेळी 92 लाख, 3 हजार, 320 रुपये नौशाद याच्याकडे दिले आहेत. सदरची कंपनी ही केरळमधील आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची शहरातील ही अलीकडच्या काळातील पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे या साखळी योजनेत पैसे गुंतवलेल्यांचे धाबे दणाणले आहे.