प्रतिनिधी / रत्नागिरी:
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एआयसीटीई-सीआयआय सर्व्हे ऑफ इंडस्टी लिंक्ड टेक्निकल इन्स्टिटय़ूट-2020’ घेण्यात आला. या सर्वेक्षणातून जाहीर करण्यात आलेल्या यादीत फिनोलेक्स ऍकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘प्लॅटिनम कॅटॅगरी’ हा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे.
या सर्वेक्षणात भारतातील सुमारे 814 उत्तम दर्जाच्या महाविद्यालयांना एआयसीटीई आणि सीआयआयकडून अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. या अंतिम फेरीमधून फिनोलेक्स ऍकॅडमीने ‘प्लॅटिनम कॅटॅगरी’ हा बहुमान मिळवला आहे.
मुंबई विद्यापीठातील 60 अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी फक्त चार अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्लॅटिनम कॅटॅगरी हा बहुमान प्राप्त झाला. एआयसीटीई-सीआयआय सर्व्हे ऑफ इंडस्ट्री लिंक्ड टेक्निकल इन्स्टिटय़ूट 2020 सर्वेक्षणामध्ये प्लॅटिनम कॅटॅगरीमध्ये स्थान मिळविणारे फिनोलेक्स कोकणातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले. अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या भारतातील सुमारे 814 उत्तम दर्जाच्या महाविद्यालयांमधून या महाविद्यालयाची निवड झाली.
अभियांत्रिकी महाविद्यालये आणि उद्योग जगत यांच्यातील भागिदारीच्या स्थितीचे मूल्यांकन करणे हे या सर्वेक्षणातील उद्दिष्ट होते. या सर्वेक्षणात मुख्यत्वे सहा मापदंडांनुसार महाविद्यालयांचे मूल्यांकन केले गेले. अभ्यासक्रम, विद्या शाखा व प्राध्यापक वर्ग, पायाभूत सुविधा, संशोधन आणि सेवा/प्रकल्प, कौशल्य विकास आणि महाविद्यालयातील प्लेसमेंट आणि प्रशासन यासारख्या मूलभूत बाबी लक्षात घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. वरील सर्व मापदंड पूर्णपणे उद्योग आणि विद्यार्थ्यांची उद्योग जगतातील प्रगती या दृष्टिकोनातून एआयसीटीई या अभियांत्रिकी शिक्षणातील शिखर असलेल्या व सीआयआय हय़ा उद्योग जगतात सर्वोच्च मानल्या जाणाऱया संस्थांकडून सांख्यिकीय विश्लेषणाच्या आधारावर तपासले गेले.
या सर्वेक्षणात अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या भारतातील सुमारे 814 उत्तम दर्जाच्या महाविद्यालयांमधून 384 महाविद्यालयांना सिल्व्हर कॅटॅगरी, 246 महाविद्यालयांना गोल्ड कॅटॅगरी, तर 184 महाविद्यालयांना प्लॅटिनम कॅटॅगरी देण्यात आली. फिनोलेक्स ऍकॅडमीने मागील दोन वर्षे गोल्ड कॅटॅगरी मिळवली असून या वर्षी महाविद्यालय प्लॅटिनम कॅटॅगरी मिळवत उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. त्याबद्दल महाविद्यालयाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
फिनोलेक्स समूहाचे अध्यक्ष पी. पी. छाब्रिया यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले हे महाविद्यालय कोकणामध्ये दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणासाठी ओळखले जाते. या महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, आय. टी., केमिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ऍन्ड टेलीकम्युनिकेशन हे पदवी अभ्यासक्रम तसेच एम. ई. (मशीन डिझाईन) व मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लीकेशन या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्यात येते.
या यशाबद्दल होप फाऊंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा व फिनोलेक्स ऍकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी सर्व प्राध्यापक, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी वृंद यांचे अभिनंदन केले.









