प्रतिनिधी / करमाळा
कुठेही वाच्यता न करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करण्याची घटना सोलापूर जिल्हय़ातील करमाळा तालुक्यातील आवाटी येथे घडली. या बलात्कारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने या प्रकाराबाबत मुलीच्या आईने पोलिसठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी आवाटी येथील सोनू उर्फ वैजीनाथ बंडगर याच्याविरोधात बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मुलींच्या सुरक्षेचा प्रशन ऐरणीवर आला आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलीवर संशयित आरोपी बंडगर याच्याकडून वारंवार बलात्कार करण्यात आला आहे. या अत्याचाराविरोधात कुठेही वाच्यता करायची नाही अशी धमकी बंडगरने पीडित मुलीला दिली होती. तिच्या अगतिकपणाचा फायदा घेत बंडगर वारंवार बलात्कार करत राहिला अशी तक्रार पीडीत युवतीच्या आईने केली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पीडित मुलीला गर्भधारणा झाल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आल्याने मुलीवर झालेल्या शारीरीक अत्याचाराला वाचा फुटली.
पीडित मुलीचा भाऊ नोकरीनिमित्त पुण्याला राहत असल्याने गावाकडील घरी ती मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. नुकतीच ती दहावी उत्तीर्ण झाली होती. संशयित बंडगर हा युवक गुंड प्रवृत्तीचा असल्याने त्याने यापूर्वी तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ती त्याच्यापासून लांबच होती, पण संशयित बंडगर एक दिवस त्या मुलीच्या घरी कुराड घेऊन आला व तीला दम देऊन घरात कोणी नाही हे पाहून तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मारुन टाकीन अशी धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर पुन्हा तिच्या शेतात जाऊन ती एकटी आहे हे पाहून पुन्हा पुन्हा बलात्कार केला. तसेच याबाबत कोणालाही सांगायचे नाही अशी धमकी दिली. कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिल्याने पीडित युवतीने याबाबत सुरूवातीला कुठेही वाच्यता केली नाही. तो वारंवार त्या मुलीला कुटुंबातील लोकांना संपवण्याची धमकी देत बलात्कार करत होता. मुलीच्या आईने मुलीला घेऊन करमाळा पोलीस ठाण्यात त्या संशयित बंडगर विरोधात तक्रार दाखल केली यानंतर त्याच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.