वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
क्रिकेट हा क्रीडाप्रकार ‘सभ्य गृहस्थांचा’ खेळ (जंटलमेन्स गेम) म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या क्षेत्रामध्ये वर्णद्वेषी शेरेबाजीला कोणतेही स्थान नसल्याचे प्रतिपादन भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केले आहे.
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या कसोटीतील खेळाच्या तिसऱया दिवशी प्रेक्षकांतील एक गटाने भारतीय संघातील खेळाडू मोहम्मद सिराज आणि बुमराह यांच्यावर वर्णद्वेषी टिपणी करत त्यांची थट्टा उडविली होती. या प्रकरणी राजीव शुक्ला यांनी आपली वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. क्रिकेट या सभ्य लोकांच्या खेळामध्यें अशा वर्तवणुकीला कोणतेही स्थान नसून ही बाब क्रिकेटला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणी भारतीय क्रिकेट मंडळाचे सचिव जय शहा यांनी भारतीय संघाबरोबर आपला संपर्क ठेवला असून भारतीय क्रिकेट मंडळाने तसेच आयसीसीने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेमुळे दोन्ही संघातील असलेल्या हितसंबंधावर विपरित परिणाम होवू शकतो, असेही क्रिकेट क्षेत्रातील काही अनुभवी प्रशासकीय व्यक्तींनी सुचित केले आहे.









