प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर कोल्हापूरच्या प्रश्न, समस्यांचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केलेला दौरा शहर शिवसेना आणि शिवसैनिकांना चार्ज करणारा ठरला आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळÎासमोर ठेवून व्यूहरचना करणाऱया राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही मंत्री शिंदे यांच्यासारख्या बडÎा नेत्याचा दौरा आयोजून राजकीय टायमिंग साधल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हÎात शिवसेना 6 आमदारांवरून 1 आमदारावर आली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. सरकारमध्ये असलेली काँग्रेस कोल्हापूर जिल्हÎात प्रबळ झाली. गेले वर्षभर शिवसेना नेतृत्व आणि मंत्र्यांचे कोरोनाच्या संकट काळात कोल्हापूरकडे दुर्लक्ष झाले. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा शुक्रवारी झाला. त्यांनी हद्दवाढ, थेट पाईप लाईन, अंबाबाई मंदिर, शाहू स्मारक, महापालिकेची निर्माण चौकातील प्रस्तावित इमारत आदींवर चर्चा करताना प्रत्यक्षात घटनास्थळी भेट देऊन, बैठका घेत आढावा घेतला. निधी देण्याचे आश्वासन दिले. शिवसैनिकांशीही मंत्री शिंदे यांनी विधान सभा निवडणुकीतील पराभवावर संवाद साधला. राजकारणात हार-जीत होत असते. शिवसैनिक कधीही खचून जात नाही. तो लढतो. पुढील निवडणुकीत जिल्हÎातील दहा आमदार जिंकण्यासाठी आता पासून कामाला लागा. कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे, असे आदेश मंत्री शिंदे यांनी दिले. त्यातून काहीशी मरगळ आलेल्या शिवसैनिकांना बळ मिळाले.
राजेश क्षीरसागर यांनी साधले टायमिंग
2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राजेश क्षीरसागर राजकारण आणि समाजकारणात ऍक्टीव्ह राहिले आहेत. कोरोना काळात त्यांनी मदतकार्य राबविले. शहराच्या विविध प्रश्नांवर भूमिका घेतली. आमदार असताना त्यांची महापालिकेतील भूमिका वेगळी होती. पण आता त्यांनी महापालिकेत ताकदीने उतरण्याची भूमिका घेतली आहे. आगामी राजकीय वाटचाल आणि महापालिकेच्या निवडणुकीचे राजकारण या पार्श्वभूमीवर मंत्री शिंदे यांचा दौरा आखण्याची राजकीय खेळी क्षीरसागर यांच्यासाठी लाभदायक ठरू शकते. अर्थात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सामना करत ते कसा लाभ उठवितात ते लवकरच स्पष्ट होईल.