आमदार दीपक केसरकर यांचे प्रतिपादन
माडखोल येथे दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
वार्ताहर / सावंतवाडी:
सिंधुदुर्गात सहकाराचे नवे पर्व सुरू झाले आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱयांसाठी योजना राबवित आहेत. माडखोल येथे दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातून दुग्ध समृद्धी येईल, असे मत माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक, झाराप भगिरथ प्रतिष्ठान आणि प्रभाकर देसाई दूध डेअरीच्या संयुक्त विद्यमाने माडखोल टेंबवाडी येथे कोकणातील पहिल्या दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, देसाई डेअरीचे मालक प्रभाकर देसाई, उद्योजक प्रशांत कामत, सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप, एम. के गावडे, पूजा परब, डी. बी. वारंग, सुनंदा राऊळ, सरपंच संजय शिरसाट, जि. प. माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, दत्ताराम कोळबेकर, आत्माराम ओटवणेकर, डी. बी. वारंग, अनिरुद्ध देसाई उपस्थित होते.
गाडय़ा देण्यापेक्षा गाई देणे पुण्य!
केसरकर म्हणाले, सतीश सावंत यांचे कार्य शेतकरी हिताचे आहे. या जिल्हय़ात कुक्कुटपालन, दूध व्यवसाय, शेळीपालन, कृषी, पर्यटनातून समृद्धी निर्माण होईल. एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना गाडय़ा देण्यापेक्षा शेतकऱयांना गाई देणे पुण्याचे काम आहे. ते काम सतीश सावंत करत आहेत. ते शेतकऱयांच्या हिताच्या योजना राबवित आहेत.
सतीश सावंत 20 वर्षे चेअरमन राहावेत!
मी ज्यांना गुरू मानले ते सहकारमहर्षी शिवरामभाऊ जाधव यांची नहेमी आठवण येते. त्यांना अपेक्षित असलेले काम सतीश सावंत करत आहेत. ज्या काळात काही लिटर दूध मिळत नव्हते त्या काळात त्यांनी दुग्ध व्यवसायाला गती दिली. सावंत यांनी आता दुग्ध व्यवसायात नवी क्रांती निर्माण केली हे खरेच कौतुकास्पद आहे. ‘चांदा ते बांदा’ योजनेला आता रत्नसिंधु म्हणून पुन्हा गती मिळेल. निवडणुकीत पैसे देण्याची पद्धत आली. पण हे पैसे देणारे कधी राजकारणात यशस्वी झाले नाहीत. जनतेने स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी जिल्हा बँका शेतकरी हिताचे काम करतात. सतीश सावंत लवकर आमच्यासोबत आले असते तर ‘चांदा ते बांदा’ योजनेचे चित्र वेगळे दिसले असते. उशिरा का होईना ते आता आमच्यासोबत आहेत. ते भविष्यात आमदार होऊनही बँकेचे 20 वर्षे चेअरमन कायम रहावेत, अशी आपली इच्छा आहे.
1500 जणांना जनावरांचे वाटप
सतीश सावंत म्हणाले, दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून येत्या वर्षभरात सावंतवाडी तालुक्यात 1500 जणांना दुभत्या जनावरांचे वितरण बँकेच्या माध्यमातून केले जाईल. वर्षभरात दहा हजार लिटर दूध संकलित केले जाईल. यातून दुग्ध व्यवसायात नवे चित्र निर्माण होईल.
दुग्ध व्यवसायाचे मॉडेल
सावंत म्हणाले, प्रशिक्षण घेतलेल्यांना कर्ज दिले जाईल. यातून नवीन व्यावसायिक तयार होतील. 25 हजार लिटरपर्यंत प्रोसेसिंग युनिट येथे तयार होतील. सर्वपक्षीय लोकांनी राजकारणविरहीत काम केल्यास शेतीपूरक व्यवसायातून नवी क्रांती पाहायला मिळेल. प्रभाकर देसाई जे कार्य करत आहेत ते वाखाणण्याजोगे आहे.
माडखोल येथे दूध प्रोसेसिंग युनिट
प्रभाकर देसाई म्हणाले, येत्या वर्षभरात 10 हजार लिटर दूध संकलन करून समृद्धी दूध केंद्रामार्फत प्रोसिसिंग युनिट केले जाईल. डॉ. देवधर म्हणाले,
ग्रामदेवतांना दुधाने अभिषेक घालायला हवा. गावात दूध क्रांती व्हायला हवी. शहरातील श्रीमंत लोकांनी गावाकडे वळून गावातील लोकांशी भागीदारी करून शेतीपूरक व्यवसायाला मदत केल्यास नवे पर्व निर्माण होईल.
एम. के. गावडे यांनी बँकेचे उत्तर भारतीय अधिकारी स्थानिक शेतकऱयांना कर्ज देताना अनेक अडचणी उभ्या करतात, अशी खंत व्यक्त केली.
प्रास्ताविक अनिरुद्ध देसाई यांनी तर सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले. यावेळी सतीश सावंत यांच्या शेतीतील गवताचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी जि. प. सभापती मंगेश तळवणेकर, रमेश सावंत, मधुकर देसाई, प्रेमानंद देसाई, गुंडू जाधव, अशोक दळवी, डी. बी. वारंग, गणपत राणे, गजानन सावंत, रामानंद शिरोडकर. पंढरी पुनाजी राऊळ, रवींद्र प्रभू, डॉ. राजेश नवांगुळ, दिलीप म्हापसेकर तसेच शेतकरी, सोसायटी चेअरमन, संचालक उपस्थित होते.