नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन कोरोना प्रतिबंधक लसींना अंतिम मंजुरी दिल्यानंतर देशात कोरोना लसीकरणाची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. ठिकठिकाणी लसीकरणासाठी रंगीत तालीम यशस्वी झाली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार, 11 जानेवारी रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना लसीकरणाच्या तयारीविषयी चर्चा करणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान लसीकरण मोहीमेची इत्यंभूत माहिती देणार आहेत. तसेच सदर बैठक आटोपल्यानंतर देशात कोरोना लसीकरण सुरू होण्याची तारीखही ते जाहीर करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधानांची बैठक सोमवारी संध्याकाळी चार वाजता सुरू होणार आहे.
लसीकरण मोहीमेसाठी आवश्यक वैद्यकीय यंत्रणा सज्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेश आणि हरियाणा वगळता देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना लसीकरणाची दुसरी देशव्यापी ड्राय रन पार पडली. या सरावसत्राद्वारे उघड झालेल्या वैद्यकीय यंत्रणेतील त्रुटी आणि समस्या दूर करण्यावर भर दिला जात आहे.
पहिल्या टप्प्यात मोफत लस
पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्णपणे विनामूल्य असणार आहे. पुढील टप्प्यांबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. पहिल्या टप्प्यात, आरोग्य आणि सुरक्षा कर्मचाऱयांसह केवळ उच्च प्राथमिकता असलेल्यांनाच लस दिली जाणार आहे. याशिवाय वृद्ध लोकांनाही पहिल्या टप्प्यात लस दिली जाईल. सर्व राज्य सरकार सध्या अशा लोकांची यादी तयार करत आहेत.