महापालिका आढावा बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहर हद्दवाढीचा फेरप्रस्ताव शासनाकडे पुन्हा सादर करा, प्रस्तावाबाबत विचार करु, असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. राज्यात नव्याने राबविण्यात आलेल्या एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
नगरविकास मंत्री शिंदे यांनी महापालिकेत एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेतली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, कोल्हापूर शहराची हद्दवाढ महापालिका स्थापनेपासून झालेली नाही. परिणामी निधी मिळण्यात मर्यादा येत आहेत. यामुळे विकास खुंटला असून शहर विकासासाठी हद्दवाढ होणे गरजेचे आहे. यापूर्वी हद्दवाढीसाठी 34 गावांचा प्रस्ताव दिला होता. मात्र विरोधामुळे तो बारगळला. त्यानंतर 2014 सालीही 10 गावांचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र तो प्रशासनाने नामंजूर केला. यामुळे शहराची हद्दवाढ रखडली आहे. प्रधान सचिव महेश पाठक यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव नव्याने तयार करा. त्याला नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या संमतीची गरज आहे, असे सांगितले.
युनिफाईड डिसीआर प्रभावी राबवा
राज्यातील सर्व शहरांमध्ये बांधकाम परवानगीसाठी वेगवेगळे नियम होते. यामुळे परवानगीसाठी समस्या निर्माण होत होत्या. राज्य सरकारने सर्वसमावेशक निर्णय घेत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली राबवली. निर्णयामुळे एफएसआयचा गैरवापर होणार नाही. घरांच्या किंमती नियंत्रणात राहणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱया दरात घरे उपलब्ध होतील. त्यामुळे या नियमावलीची महापालिका हद्दीत प्रभावीपणे अंमलबजावणी करा, अशी सूचना मंत्री शिंदे यांनी केली.