– नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; दुसऱया टप्प्यातील कामासाठी निधी देण्याचे आश्वासन
प्रतिनिधी/कोल्हापूर
राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक स्थळासाठी 8 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. समाधी स्मारक स्थळाचे पहिले काम महापालिकेने स्वनिधीतून केले आहे. दुसऱया टप्प्यातील कामासाठी सुमारे 8 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. हा निधी महापालिकेला नगरविकास विभागाकडून देण्याचे आश्वासन मंत्री शिंदे यांनी दिले.
नगरविकास मंत्री शिंदे शुक्रवारी कोल्हापूर दौऱयावर होते. त्यांनी महापालिकेमध्ये आढावा बैठक घेत सुरु असलेल्या विकासकामांबाबत माहिती घेतली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे आणि उपआयुक्त निखिल मोरे यांनी शहरात सुरु असलेली विकासकामे, प्रलंबित कामे, आवश्यक निधी याबाबतची सविस्तर माहिती मंत्री शिंदे यांना दिली.
आढावा बैठकीमध्ये प्रशासक डॉ. बलकवडे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक स्थळाचे पहिल्या टप्प्यातील काम महापालिकेने 2 कोटी रुपयांच्या स्वनिधीतून पूर्ण केले आहे. दुसऱया टप्प्यात आर्ट गॅलरी, संग्रहालय यासह अन्य कामांसाठी 8 कोटी रुपयांच्या निधीची गरज असल्याचे मंत्री शिंदे यांना सांगितले. यावेळी मंत्री शिंदे यांनी कामाबाबत माहिती घेत तत्काळ 8 कोटींच्या निधीची घोषणा केली.
यावेळी नगरविकासचे प्रधान सचिव-2 महेश पाठक, आरोग्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, माजी महापौर निलोफर आजरेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदींसह महापालिकेचे अधिकारी, माजी पदाधिकारी उपस्थित होते.
रंकाळा संवर्धन, नाटÎगृहासाठी निधी देऊ
संगीतसूर्य केशवराव भोसले नाटÎगृह आणि खासबाग मैदान सुशोभिकरण आणि डागडुजीसाठी पहिल्या टप्प्यात मिळालेल्या 10 कोटींच्या निधीतून नाटÎगृह अद्ययावत केले आहे. दुसऱया टप्प्यातील कामासाठी अजून 14 कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचे प्रशासक डॉ. बलकवडे यांनी सांगितले. यावर मंत्री शिंदे यांनी नाटÎगृहासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करु, असे सांगितले. कोल्हापुरातील रंकाळा तलाव हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. त्याचे जतन संवर्धन होणे गरजेचे आहे. पर्यटनाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळतो. महापालिकेच्या उत्पन्नामध्येही वाढ होईल. त्यामुळ रंकाळा सवंर्धनासाठी निधी देण्याचे आश्वासन मंत्री शिंदे यांनी दिले.
कंस्ट्रक्शन टीडीआरमधून विकासकामे करा
महापालिकेची सध्याची इमारत ऐतिहासिक आहे. इमारतीमध्ये बदल करता येत नाही. तसेच इमारतही अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 50 कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळावी अशी मागणी डॉ. बलकवडे यांनी दिली. यावर मंत्री शिंदे यांनी कंस्ट्रक्शन टीडीआरमधून इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले. कल्याण, ठाणे महापालिकेने त्यांच्या क्षेत्रातील अनेक रस्ते, सुशोभिकरण यासह अन्य सुमारे 2000 कोटींची विकासकामे कंन्स्ट्रक्शन टीडीआरमधून त्यांनी केली आहेत. याबाबत माहिती घ्या. शहरातील सर्व कामांसाठी निधी देणे शक्य नाही. कन्स्ट्रक्शन टिडिआरच्या माध्यमातून विकासकामे करण्याचा प्रयत्न करा, अशी सूचना त्यांनी केली.
स्मारकाबाबत चर्चा करु
कोल्हापुरातही राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक होणे महत्त्वाचे आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. कॅबिनेटमध्येही याबाबत चर्चा करुन स्मारकासाठी नगरविकासकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. महापालिकेकडून निधीची मागणी जास्त आहे. मात्र तुलनेत उत्पन्न कमी आहे. कोणत्या मार्गाने महापालिकेचे उत्पन्न वाढवता येईल याचा विचार करुन उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करा. 2019-20 यावर्षातील 50 कोटीचा निधी महापालिकेसाठी मंजूर आहे. मात्र यापैकी 25 कोटींच्या कामाचेच प्रस्ताव आले आहेत. प्रलंबित प्रस्ताव द्या तत्काळ निधी उपलब्ध करुन देऊ असे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सांगितले. महापालिकेने आरोग्य अधिकारी पदासाठी नाव सुचवावे, त्यांची नेमणूक करु असे आश्वासन दिले.
थेट पाईपलाईनची गती वाढवा
थेट पाईपलाईन, अमृत योजनेमधील कामासाठी आणखी निधीची आवश्यकता आहे. यानिधीची मागणी महापालिकेकडुन होत आहे. मात्र यासाठी संबंधित कामाची गती दिसने आवश्यक आहे. कामाची प्रगती बघून पुढील निधी दिला जातो. त्यामुळे थेटपाईपलाईनसारख्या विकासकामांची गती वाढवा, म्हणजे पुढील निधी देणे शक्य होईल असे प्रधान सचिव पाठक यांनी सांगितले.








