वार्ताहर / बागणी
येथील चांदोली वसाहत येथे रहिवाशी असलेले महादेव गुणवंत बामणे यांच्या शेतात राहते घर व शेती वीज कनेक्शन आहे. या ठिकाणी एजी कनेक्शन आहे. सध्या आष्टा वडगाव रस्त्याचे काम सुरू असून ३ डिसेंबर २०२० रोजी उसाच्या ट्रकमध्ये वायर अडकून तुटली आहे. ही जोडून मिळावी या साठी महादेव बामणे हे शेतकरी गेली महिनाभर हेलपाटे मारत आहेत पण अधिकाऱ्यांना वेळ मिळेना झाला आहे. तर शेतकऱ्यांना उद्धट बोलणे व उडवा उडवीची उत्तरे देण्यात कर्मचारी समाधान मानत आहेत.
सदर वायर उसाच्या वाहतुकी दरम्यान ट्रकमध्ये अडकून तुटली आहे. त्याचवेळी मोठा अनर्थ टळला आहे. महादेव बामणे यांनी ही वायर रस्त्यातून बाजूला करत वाहतुकीस मार्ग खुला केला होता. गेली महिना झाले ते वारंवार महावितरण कार्यालयात हेलपाटे मारत आहेत तर त्यांना बघू, करू, खाजगी कॉन्ट्रॅक्टकडून घ्या, तुम्हांला गरज असेल तर वायर नवीन आणा अशी उत्तरे कर्मचारी पाटील व लाईनम यांनी दिली आहे. येथील अधिकारी जाधव यांच्या कानावर हा प्रकार घातला असता त्यांनी देखील ह्या कडे डोळे झाक केली आहे. मग शेतकऱ्यांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे असा सवाल सध्या शेतकरी वर्गातून होत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित तुटलेली वायर जोडावी अन्यथा वरिष्ठांना याबाबत तक्रार करून पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे यावेळी त्यांनी निवेदनात म्हटले आहे. बागणी महावितरण कार्यालय नेहमीच असे चर्चेत राहिले आहे. शेतकरी व सामान्य लोकांना त्रास देणे हाच यांचा मुख्य उद्देश आहे की काय असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.