ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
टेस्ला इंक आणि स्पेसएक्स कंपनीचे मालक एलन मस्क यांनी ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकत जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिले स्थान गाठले आहे.
मस्क यांची एकूण संपत्ती 188.5 अब्ज डॉलर म्हणजेच 1,38,42,78,96,75,000 रुपये एवढी आहे. बेझोस यांच्यापेक्षा ही संपत्ती 1.5 अब्ज डॉलरने अधिक आहे.
ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, एलन मस्क यांची टेस्ला कंपनीमध्ये 20 टक्के हिस्सेदारी आहे. मागील वर्षी टेस्लाच्या समभागांमध्ये आठ पटीने वाढ झाली होती. त्यामुळे ही जगातील सर्वात महागडी कंपनी ठरली होती. गुरुवारी (दि. 7 जानेवारी) टेस्लाच्या समभागांमध्ये 7.4 टक्क्यांनी वाढ झाली. या समभागाचे मूल्य 811.31 डॉलर्स होते. मागील 12 महिन्यांमध्ये मस्क यांच्या संपत्तीमध्ये 150 अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे.
मात्र, फोर्ब्स बिलिनियर्सच्या यादीनुसार, मस्क यांची संपत्ती अजूनही बेझोस यांच्यापेक्षा 7.8 अब्ज डॉलर्सने कमी असल्याचे सांगण्यात येते.









