शेतकरी सन्मान योजनेची रक्कम करणार वसूल
सावंतवाडी तालुक्यात साडेचारशेहून अधिकजण
रक्कम न भरल्यास सातबारावर बोजा
संतोष सावंत / सावंतवाडी:
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱया शासकीय नोकरदार, आयकर पात्र व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आला असून त्यांच्याकडून संबंधित अनुदान वसूल केले जाणार आहे. या सर्वांकडून सहा हजार रुपयांची रक्कम वसुलीसाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. येत्या आठ दिवसात रक्कम तलाठी कार्यालय महसूल विभागाकडे जमा करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हानिहाय अशी यादी केंद्राकडून पाठविण्यात आली आहे.
केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविली.
या अंतर्गत प्रत्येक शेतकऱयाच्या बँक खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा केले जातात. ज्यांची नावे सातबारावर आहेत, त्यांना लाभ दिला जातो. त्यानुसार सातबारावर नावे असलेल्या सर्व व्यक्तींनी याचा लाभ घेतला. यात काहीजण शासकीय नोकरदार, आयकरपात्र आहेत. आता सरकारने लाभ घेणाऱया यादीतील जे आयकर भरतात तसेच शासकीय कर्मचारी व अधिकारी आहेत, त्यांची यादी तयार केली आहे. रक्कम परत न केल्यास त्यंच्या सातबारावर या रकमेचा बोजा चढविण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात हजारच्या घरात असे शेतकरी असल्याची शक्यता आहे.
गतवर्षी 31 मार्च 2020 पूर्वी पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांच्या खाती जमा झाला. त्यानंतर कोरोना काळात काही राज्यात हा निधी शेतकऱयांच्या बँक खात्यात आला नव्हता. मात्र, सन डिसेंबर 2020 पूर्वी सर्व शेतकऱयांच्या बँक खात्यात उर्वरित रक्कम तिन्ही हप्त्यासह जमा झाली.
आयकर भरणाऱयांना वसुलीच्या नोटिसा
केंद्र सरकारच्या या किसान सन्मान निधीचा लाभ फक्त शेतकऱयांनीच घ्यायचा होता. मात्र, शासकीय कर्मचारी, अधिकारी, उद्योजक, व्यावसायिकांनीही या योजनेचा लाभ घेतला. केंद्र सरकारने अशा आर्थिक सधन व्यक्तींची माहिती काढली. जे या योजनेत बसत नाहीत, त्या सर्वांची गावनिहाय यादी तयार करून त्यांना ही रक्कम पुन्हा शासनाकडे जमा करण्याची नोटीस जारी केली आहे. त्यानुसार तलाठय़ांनी कार्यवाही सुरू केली आहे.
सावंतवाडीत 13 हजार लाभार्थी
सावंतवाडी तालुक्यात 13 हजार किसान सन्मान निधीचे लाभार्थी आहेत. त्यापैकी 450 जणांचे उत्पन्न अधिक आहे. ते आयकर भरतात. तसेच शासकीय कर्मचारी आहेत, त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. या व्यक्तींच्या घरी जाऊन गावचे तलाठी ही रक्कम पुन्हा जमा करण्याच्या सूचना देत आहेत.
…तर सातबारावर बोजा
किसान सन्मान निधी योजनेचा फक्त शेतकऱयांनाच लाभ घेता येईल. जे अपात्र आहेत त्यांनी रक्कम परत केली नाही, तर त्यांच्या सातबारावर बोजा राहणार आहे. कुटुंबातील एक व्यक्ती जरी आयकर भरत असेल अथवा शासकीय नोकरदार असेल तरी सातबारावर नावे असलेल्यांनाही नोटिसा बजावण्यात येत आहेत. या रकमेचा फायदा काही शिक्षक, उद्योजक, व्यापारी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱयांनी घेतला आहे. या सर्वांची माहिती आधार बँक लिंकवरून घेण्यात आली आहे. त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाणार आहे. सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी वसूल झालेली रक्कम तलाठी कार्यालयात जमा केली जाईल. नंतर ती तहसीलच्या तिजोरीत वर्ग केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.