उंडाळेत शोकाकुल वातावरणात रक्षा विसर्जन
प्रतिनिधी / कराड
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, स्वर्गीय विलासकाका पाटील-उंडाळकर प्रतिष्ठान स्थापन करून त्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मृती जपत यापुढे सामाजिक क्षेत्रात काम करणार असल्याची घोषणा रयत संघटनेचे अध्यक्ष, प्रा. धनाजी काटकर यांनी केली.
माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे रक्षा विसर्जन उंडाळे (ता. कराड) येथे बुधवारी शोकाकुल वातावरणात पार पडले. त्यावेळी याबाबतची घोषणा करण्यात आली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह हजारोंची उपस्थिती यावेळी होती. महाराष्ट्र शासनाच्या वतीने गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी श्रद्धांजली अर्पण केली. विधिमंडळामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने कसे काम करावे, याचे मार्गदर्शन काकांकडून सर्व नवीन आमदारांना मिळत असे. काका सभागृहात येताच सर्व आमदारही त्यांना सन्मान देत. जिह्याच्या सहकार क्षेत्राला दिशा देण्याचे व शिस्त लावण्याचे काम काकांनी केले. त्यांचे विचार पुढे चालवण्याची जबाबदारी आपणावर आली आहे. ती यशस्वीरितीने पार पाडणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले. सहकार क्षेत्राबरोबर, राजकारण व समाजकारणातील देवमाणूस हरपला, अशा शब्दात आज विविध मान्यवरांनी उंडाळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. काकांच्या इच्छेनुसार रक्षा नदीत न सोडता या रक्षेत वृक्षारोपण करण्यात आले.
स्मरणगाथा तयार करण्याचा मानस
दरम्यान, सार्वजनिक ग्रंथालय उंडाळे व रयत संघटना यांच्या ‘चला काकांना भेटूया’ या शीर्षकाखाली काकांच्या जीवनावर स्मरणगाथा तयार करण्याचा मानस जाहीर करण्यात आला. आपल्या बाबतीतील काकांचा एखादा भावपूर्ण प्रसंग, एखादी अविस्मरणीय घटना, एखादा अनुभव तसेच दुर्मिळ फोटो असे काही असेल तर उंडाळे ग्रंथालयात ते सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली
स्वर्गीय विलासराव पाटील- उंडाळकर यांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. मंत्री अनिल परब यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखविला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी दोन मिनिटे उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.









